लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा - भारतात मुख्यत्वे हिवाळी स्थलांतर करून येणारा आणि महाराष्ट्रात तुरळक नोंद असलेला तिलोरी मैना हा पक्षी वर्धा जिल्ह्यात आढळून आला असून बहारचे पक्षी अभ्यासक दिलीप वीरखडे यांनी या पक्ष्याची नोंद केली आहे.
या पक्ष्याचे इंग्रजी नाव युरोपियन स्टर्लिंग असून शास्त्रीय नाव 'स्टरनस वल्गारीस' असे आहे. तिलोरी मैना या पक्ष्याचा मूळ अधिवास पश्चिम व दक्षिण युरोप तसेच नैऋत्य आशियात असून भारतात हे पक्षी हिवाळी स्थलांतर करून येतात. हे स्थलांतरण प्रामुख्याने राजस्थान, गुजरात, पंजाब, दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या भारताच्या दक्षिण, वायव्य व उत्तरेकडील भागात होते.
काश्मीरमध्ये हा पक्षी उन्हाळी स्थलांतर करतो. तिलोरी मैना (स्टर्निडा) कुळातील पक्षी आहे. साधारणत: वीस सेंटीमीटर लांबीचा असतो. लहान शेपटी, लांब व टोकदार चोच तसेच हिरवी आणि जांभळी झाक असलेला मुख्यत्वे काळ्या रंगाचा हा पक्षी आहे. याच्या शरीराच्या बहुतांश भागावर पांढुरके ठिपके अथवा ठिपक्यांची रांग दिसून येते. दलदली क्षेत्र, माळरान व मनुष्यवस्ती जवळील भाग हा यांचा अधिवास आहे.
आर्वी तालुक्यातील एका धरणानजीक कवडी मैनेच्या (एशियन पाईड स्टार्लिंग) एका छोट्या थव्यात हा पक्षी आढळून आला. बहार नेचर फाऊंडेशनने पक्षी सप्ताहात 'वर्धा जिल्ह्याची पक्षीसूची' पुनर्प्रकाशित केलेली असून त्यात 'तिलोरी मैना'या पक्ष्याची भर पडलेली आहे.