लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (टालाटुले) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पाडून नव्याने सुसज्ज इमारत बांधण्यात आली. बºयाच दिवसांपासून ही नवी इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होती. अखेर आज माजी जि.प.सभापती मिलिंद भेंडे यांच्या पुढाकाराने उद्घाटनाची तयारी करण्यात आली. परंतु या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्यामुळे आरोग्य केंद्राच्या गेटला हार घालून आणि इमारतीच्या बाहेर नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले. या अनोख्या उद्घाटन सोहळ्याची सर्वत्र चर्चा रंगली होती.तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशी परिसरातील २४ गावे जोडण्यात आली असून १० हजार लोकसंख्येच्या आरोग्याची जबाबदारी आहे. चार वर्षांपूर्वी आरोग्य केंद्राची जुनी इमारत पाडून नवीन इमारतीचे बांधकाम हाती घेण्यात आले. त्यामुळे येथील कामकाज डॉक्टरांच्या दोन शासकीय निवासस्थानावरुन सुरुआहे. जागेअभावी आरोग्य व्यवस्था पूर्णत: ढेपाळल्याने नवीन इमारत तात्काळ पूर्ण करुन सेवेत आणण्याची गरज होती. दरम्यानच्या काळात या इमारतीचे बांधकाम रखडल्याने ‘लोकमत’ ने वारंवार पाठपुरावा केला. त्यानंतर कामाला गती देवून काम पूर्णत्वास गेले. या नवीन इमारतीचे उद्घाटन शनिवारी मान्यवरांच्या हस्ते करण्याचे नियोजन करण्यात आले. परंतु शुक्रवारी रात्रीपासूनच आरोग्य केंद्राच्या परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला. शनिवारी सकाळी नियोजित वेळेनुसार उद्घाटन करण्यासाठी एकत्र आलेल्यांना आत प्रवेश नाकारण्यात आला. परिणामी जि.प.चे माजी सभापती मिलिंद भेंडे, पं.स. सभापती महेश आगे, जि.प.सदस्य विमल प्रमोद वरभे तसेच सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी मुख्य चौकात येवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. त्यानंतर सर्व नारेबाजी देत आरोग्य केंद्राकडे गेले. पण, आत प्रवेश नाकारल्याने त्यांनी गेटला हार घालून गेट समोरच नारळ फोडले.