लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी (शहीद): तालुक्यातील पेठअहमदपूर-किन्हाळा मार्गावर एका पुलाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, सदर कामात विना रॉयल्टी वर्धा नदीच्या माती मिश्रीत रेतीचा आणि गिट्टी खदानवरील इस्ट (माती मिश्रित बुगदी) चा सर्रास वापर सुरू आहे. हे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून, अधिकाऱ्यांकडूनही साधी पाहणीही केली जात नसल्याने कामाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून सुमारे सव्वादोन कोटी रुपये खर्च करून पुलाचे बांधकाम केले जात आहे. सदरचे काम अंदाजपत्रकानुसार करण्यात येताना दिसून येत नाही. खोदकाम अतिशय कमी करण्यात आले. त्यामुळेच या पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विशेष बाब म्हणजे शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी काँक्रीट करण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी कोणीही कामावर कधी फिरकूनही पाहत नसल्याची ओरड नागरिकांकडून होत आहे.
गेल्या अनेक वर्षांनंतर या मार्गावरील पुलाची समस्या निकाली निघाली. मात्र, सदोष बांधकामामुळे या पुलाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष याला कारणीभूत ठरत आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाचा दर्जा खालावल्याने कमालीचे आश्चर्य व्यक्त होत आहे. सदर ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी सळ्या अतिशय जुन्या असल्यामुळे त्या किती वर्षे टिकणार? हा सुद्धा प्रश्न आहे. पुलाखाली पाणी असल्याने संबंधित कंत्राटदाराने थातूरमातूर खोदकाम करून पुलाच्या भिंती उभ्या केल्या. मात्र, जमिनीमध्ये पाहिजे तशा प्रमाणामध्ये पाया केला नसल्याने या पुलाच्या बांधकामावर किती दिवस तग धरेल हे सांगणे कठीण आहे.
चोरीच्या वाळूचा कामात वापर सदर पुलाच्या कामामध्ये परिसरात वाहणाऱ्या नाल्यातील मातीमिश्रीत वाळूचा उपयोग केला जात आहे. तसेच, गिट्टीवरील टाकाऊ खनिज घटकांमधील डस्ट (माती मिश्रित बुकटी) या ठिकाणी आणून काँक्रीटमध्ये मिक्स केले जात आहे. त्यामुळे या पुलाचे भविष्य टांगणीला लागले आहे.
"सदर पुलाच्या कामामध्ये मातीमिश्रित वर्धा नदीची काळी रेती आणि गिट्टी खदानवरील डस्ट (बुकटी) है अंदाजपत्रकामधील मिक्स डिझाइनमध्ये कुठेही नाही. त्यामुळे ते वापरणे चुकीचे आहे. यासंबंधी संबंधित कंत्राटदाराला सूचना करण्यात येईल." - गणेश गोंडे, शाखा अभियंता कार्यालय मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, उपविभाग आर्वी.