वर्धा : सत्तांतर झाल्यापासून राज्यात राजकीय शांतता पसरली आहे. गेल्या दीड वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रतीक्षा आहे. अशातच आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होऊ घातल्याने ही लोकसभा आणि विधानसभेची रंगीत तालीम समजली जात आहे. त्यामुळे गावापासून शहरापर्यंत बाजार समितीच्या निवडणुकीचा आखाडा रंगू लागला असून, ‘सत्तेसाठी काही पण!’ अशीच भूमिका राजकीय पक्षांनी घेतल्याने कार्यकर्त्यांनीही तोंडात बोट टाकले आहे.
जिल्ह्यात वर्धा, सिंदी (रेल्वे), पुलगाव, आर्वी, आष्टी, कारंजा (घाडगे) आणि हिंगणघाट या सात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. प्रत्येक बाजार समितीमध्ये १८ संचालक निवडून द्यायचे असल्याने एकूण १२६ संचालकांकरिता नामांकन अर्ज दाखल झाले असून, निवडणुकीचा रणसंग्राम चांगलाच तापला आहे. आतापर्यंत अपवादवगळता सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राहिली आहे. आत्ताच्या निवडणुकीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस ही महाविकास आघाडी सर्व निवडणुका सोबत लढणार असल्याची घोषणा वरिष्ठ पातळीवरून होत असली तरीही स्थानिक पातळीवर मात्र, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कुठे भाजप काँग्रेसच्या गटासोबत, तर कुठे काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेससोबत निवडणुकीच्या रिंंगणात उतरल्याचे दिसून येत आहे. भाजपा आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष या निवडणुकीकरिता मतांचा जोगवा मागत असल्याने या विचित्र युतीमुळे मतदारही संभ्रमात आहेत.
कोणत्या पक्षाचे बळ किती?
काँग्रेस : जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. परंतु, अंतर्गत कुरघोड्यांमुळे या जिल्ह्यामध्ये केवळ एक आमदार आहे. परंतु, सर्वांत मोठा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसच अग्रस्थानी आहे. आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था, कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राहिली आहे.
राष्ट्रवादी : जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी युतीतून सत्ता राखण्याचे काम केले आहे. बाजार समितीवरही यांनी सत्ता कायम ठेवली आहे. बहुतांश बाजार समित्यांवर यांचाच सभापती व उपसभापती राहिला आहे. हल्ली राष्ट्रवादी काँग्रेसची हिंगणघाट आणि समुद्रपूर बाजार समितीमध्ये मोठी पकड आहे.
भाजप : गेल्या दोन पंचवार्षिकपासून जिल्ह्यामध्ये भाजपाची ताकद चांगलीच वाढली आहे. चारपैकी तीन विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघही त्यांच्याच ताब्यात आहेत. यासोबतच मिनी मंत्रालयातही त्यांचीच सत्ता होती. आता कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्येही उडी घेतली असून, सत्तेसाठी हातमिळवणी सुरू आहे.
उद्धव ठाकरे गट : शिवसेनेच्या फुटीनंतरही कट्टर शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या गटात सहभागी झाले. त्यामुळे जुनी शिवसेना अद्याप जिल्ह्यामध्ये अस्तित्व राखून आहे. एका नगरपंचायतीत उद्धव ठाकरे गटाच्या नगराध्यक्षा असून, त्यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे.
पुढचे सरकार आमचेच!
जिल्ह्यातील सातही बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडी पूर्ण क्षमतेने रिंगणात उतरली आहे. ही निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नसल्याने स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन निवडणूक लढविली जाते. तरीही सर्वांना महाविकास आघाडीनेच निवडणूक लढण्याच्या सूचना केल्या आहेत.
- मनोज चांदूरकर, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका भारतीय जनता पार्टी लढवीत आहे. त्यासाठी मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. ही निवडणूक सहकार क्षेत्राशी संबंधित असल्याने या क्षेत्राशी निगडीत स्थानिक गटांसोबत युती केली आहे. कुठे युतीसंदर्भात चर्चा सुरू आहे.
- सुनील गफाट, जिल्हाध्यक्ष, भाजप
जिल्ह्यात आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या युतीनेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका लढविल्या आहेत. आताही महाविकास आघाडीच्या नेतृत्त्वात निवडणुका लढविल्या जात असून, काही ठिकाणी समविचारी पक्षांना किंवा गटांना सोबत घेतले जात आहे.
- सुनील राऊत, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या नेतृत्त्वात उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांनीही नामांकन दाखल केले आहे. तिन्ही पक्षांंच्या एकजुटीने ही निवडणूक लढविली जात असून, शिवसेना पूर्ण क्षमतेने कामाला लागली आहे.
- अनिल देवतारे, जिल्हाप्रमुख, शिवसेना उद्धव ठाकरे गट
कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत लढत आहोत. केवळ एकाच बाजार समितीमध्ये एक उमेदवार उभा केला आहे. इतर ठिकाणी उमेदवार नाही. पण, आमचा भारतीय जनता पार्टीला पूर्ण पाठिंबा व सहकार्य आहे.
- गणेश इखार, जिल्हाप्रमुख, शिवसेना, एकनाथ शिंदे गट