झाडांच्या जागेवर कठडे : लाखोंचा निधी व्यर्थवायगाव (नि.) : नजीकच्या गाडेगाव ग्रामपंचायतील शासन स्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत; पण अनेक योजना या गावात प्रत्यक्षात कृतीत न उतरविता केवळ कागदी घोडे नाचविल्याचेच समोर आले. यामुळे पर्यावरण संतुलित संमृद्ध ग्राम योजनेचे तीनतेराच झाल्याचे दिसते.पर्यावरणाचे संवर्धन, जतन व सरंक्षण करून संमृद्ध व संपन्न गावाची निर्मिती व्हावी, यासाठी शासनाच्या ग्राम विकास व जलसंधारण विभागाने लोक सहभागातून वृक्ष संवर्धनासारखी महत्त्वाची योजना ग्रामपंचायतीमार्फत राबविली; पण गावातील सत्ताधाऱ्यांनीच योजनेचा बट्याबोळ केल्याचे चित्र आहे. एक हजार लोकसंख्येच्या ग्रा.पं. ला प्रत्येक वर्षी दोन लाख याप्रमाणे तीन वर्षे हा निधी शासनाकडून मिळतो. यात रोजगार सेवकामार्फत वृक्षांचे जतन करायचे असते. यासाठी १८० रुपयेप्रमाणे चार मजुरांची पाणी देण्यासाठी अंशकालीन तरतूद करण्यात आली आहे. असे असताना सद्यस्थितीत एकही झाड गाडेगाव येथे जिवंत नसल्याचे दिसते. गावातील रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या झाडांचे केवळ कठडे शिल्लक राहिले असून रोपटे बेपत्ता झाली आहेत. वृक्षारोपण योजनेची पाहणी करण्यासाठी जि.प. व पं.स. स्तरावर नियंत्रण समित्या स्थापित करण्यात आल्या आहेत; पण त्यांचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव आहे. याकडे लक्ष देत चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)
पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेचे तीनतेरा
By admin | Published: October 11, 2015 12:27 AM