वाहतूक पोलिसांनी बुजविले खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 12:01 AM2018-05-27T00:01:29+5:302018-05-27T00:01:29+5:30
स्थानिक बजाज चौकातील रस्ता अनेक दिवसांपासून खड्डेमय झाला होता. ते खड्डे बुजविणे क्रमप्राप्त असताना त्याकडे संबंधितांकडून दुर्लक्षच करण्यात धन्यता मानली जात होती. संभाव्य धोका लक्षात घेता वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी पुढाकार घेवून शनिवारी बजाज चौक परिसरातील जीवघेणे खड्डे खड्डे बुजविले. यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्थानिक बजाज चौकातील रस्ता अनेक दिवसांपासून खड्डेमय झाला होता. ते खड्डे बुजविणे क्रमप्राप्त असताना त्याकडे संबंधितांकडून दुर्लक्षच करण्यात धन्यता मानली जात होती. संभाव्य धोका लक्षात घेता वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी पुढाकार घेवून शनिवारी बजाज चौक परिसरातील जीवघेणे खड्डे खड्डे बुजविले. यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
बजाज चौक येथील आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलाच्या रुंदीकरणाचे व सिमेंटीकरणाचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. सध्या उड्डाण पुलाचे काम सुरू असले तरी गत काही महिन्यांपासून स्थानिक बजाज चौक परिसरात रस्त्याच्या मधोमध तयार झालेल्या जीवघेण्या खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व वर्धा न.प.च्या बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत होते. बजाज चौक हा नेहमीच वर्दळ असणारा परिसर आहे. याच परिसरात पेट्रोलपंप, बस स्थानक तसेच भाजी बाजार आहे. परंतु, या परिसरातून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना रस्त्यावरील खड्ड्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांची समस्या व संभाव्य धोका लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेत सदर खड्डे बुजविले. विशेष म्हणजे, शहरातून जड वाहनास बंदी आहे. जे जड वाहन या नियमाचे उल्लंघन करताना आढळून आले त्या वाहनचालकावर दंडात्मक कारवाई न करता त्याच्याच मदतीने वाहतूक पोलीस कर्मचारी शफी उल्ला खान यांनी या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून घेतला.
वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत राबविलेला उपक्रम अतिशय उत्तम आहे. पावसाळ्यापूर्वी सदर जीवघेणे खड्डे बुजविण्यात आल्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. इतकेच नव्हे तर अनुचित घटनेला आळाही घालता येईल.
- दत्तात्रय गुरव, सहापोलीस निरीक्षक,
वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा.