‘वर्धा जंक्शन’ची गाडी रुळावर येईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 05:00 AM2020-09-24T05:00:00+5:302020-09-24T05:00:07+5:30
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी काही रेल्वेगाड्या सुरु केल्या आहेत. आरक्षित तिकिटावरच त्यातून प्रवास करता येत आहे. लाखो लोक प्रवासासाठी प्रतीक्षेत आहेत. पुरेशा गाड्या सुरु झालेल्या नाहीत. मर्यादित गाड्या सुरु असल्याने तिकिटांसाठी मोठी ‘वेटिंग लिस्ट’ असते. प्रवासी तयार आहेत. पण, गाड्या नाहीत, अशी स्थिती आहे.
चैतन्य जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लॉकडाऊनच्या काळात अनेकांना सक्तीने घरी राहावे लागले. काहींनी घरुन काम सुरु केले. मात्र, ज्यांचे पोट हातावर आहे, अशा कामगार आणि मजुरांचे झालेले हाल आजतागायत कायम आहेत. लाखो लोकांचा उदरनिर्वाह करणाऱ्या रेल्वेस्थानकांवर अजूनही हजारो हातांना कामाची प्रतीक्षा आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी काही रेल्वेगाड्या सुरु केल्या आहेत. आरक्षित तिकिटावरच त्यातून प्रवास करता येत आहे. लाखो लोक प्रवासासाठी प्रतीक्षेत आहेत. पुरेशा गाड्या सुरु झालेल्या नाहीत. मर्यादित गाड्या सुरु असल्याने तिकिटांसाठी मोठी ‘वेटिंग लिस्ट’ असते. प्रवासी तयार आहेत. पण, गाड्या नाहीत, अशी स्थिती आहे. वर्धा रेल्वे जंक्शनवरुन लॉकडाऊनपूर्वी अनेक प्रवासी गाड्या धावत होत्या. या गाड्यांमधून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी असायची. मात्र, लॉकडाऊन लागल्याने एरव्ही प्रवाशांनी गजबजलेल्या रेल्वेस्थानकावर आज घडीला निरव शांतता दिसून येत आहे. हातावर पोट असलेल्यांवर मात्र, उपासमारीची वेळ आली असून अनेक हमाल आपल्या स्वगावी कामाच्या शोधात परतले आहे.
फलाटावरील विक्रेत्यांवर आली उपासमार
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी शासनाने प्रवासी रेल्वे वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे वर्धा रेल्वेस्थानकावर शुकशुकाट असून फलाटांवर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या हातमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. वर्धा रेल्वेस्थानकावर दररोज २० ते २२ प्रवासी रेल्वे गाड्यांची ये-जा असते.
स्थानकावरील फलाटांवर सुमारे ३० पेक्षा जास्त खाद्यपदार्थ विक्रेते आलेल्या प्रवासी गाड्यांवर दिवस-रात्र उभे राहून कुटुंबीयांसाठी पोटाचा प्रश्न सुटावा, दोन पैसे मिळावे, यासाठी डोळ्यात तेल ओतून अख्खी गाडी पिंजून काढायचे. मात्र, २३ मार्च पासून लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानकात गाड्यांचे आगमन होत नसल्याने प्रवेशबंदी असून कोणतीही प्रवासी गाडी येत नसल्याने स्थानकावरील मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
जीवनावश्यक वस्तूंची मदत द्यावी
उदरनिर्वाह कसा चालवावा, याची त्यांना चिंता सतावत आहे. कोरोनामुळे हमाल, रिक्षाचालक, व्यावसायिकांना चांगलाच फटका बसला आहे. प्रशासनाने रेल्वेस्थानकावरील हातावरच्या मजुरांची उदरनिर्वाहाची व्यवस्था करावी.
विशेषत: ज्या मक्तेदाराकडे मजूर कामावर होते त्यांनी निदान या परिस्थितीत त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.