बदल्यांमुळे ‘ऑनलाईन शिक्षणात’ बाधा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 05:00 AM2020-08-01T05:00:00+5:302020-08-01T05:00:32+5:30
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या वर्ग ३ व ४ मधील कर्मचाऱ्यांची तीन दिवस बदली प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये ११ विभागातील जवळपास १०१ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, आपसी, विनंती व समानिकरण बदल्या करण्यात आल्या. आता जिल्हा परिषदेच्या एकूण २ हजार ८१२ शिक्षकांपैकी १५ टक्के शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. सध्या शाळा बंद असल्यामुळे ऑनलाईनपद्धतीने शिक्षण दिले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोविड-१९ च्या प्रकोपामुळे जिल्ह्यातील शाळा कधी सुरु होईल, याचा थांगपत्ता नाही. विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात रहावे म्हणून ऑनलाईन शिक्षण दिल्या जात आहे. यामध्ये ग्रामीण भागातील शिक्षकांची महत्त्वाची भूमिका आहे. अशा स्थितीत शिक्षकांच्या बदल्याचे धोरण अवलंबिल्याने सध्या विद्यार्थ्यांशी जुळलेल्या शिक्षकांच्या बदल्या झाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या ‘ऑनलाईन शिक्षणात’ खंड पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कोरोनाकाळात शिक्षकांच्या बदल्या नकोच, असाच सूर सर्व स्तरातून उमटत आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या वर्ग ३ व ४ मधील कर्मचाऱ्यांची तीन दिवस बदली प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये ११ विभागातील जवळपास १०१ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, आपसी, विनंती व समानिकरण बदल्या करण्यात आल्या. आता जिल्हा परिषदेच्या एकूण २ हजार ८१२ शिक्षकांपैकी १५ टक्के शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. सध्या शाळा बंद असल्यामुळे ऑनलाईनपद्धतीने शिक्षण दिले जात आहे. ग्रामीण भागामध्ये प्रत्येक पालकांकडे अॅण्ड्राईड मोबाईल नाही.
या मंदिच्या दिवसात सर्वांनी मोबाईल खरेदी करावे, अशी परिस्थिती नाही. तसेच अनेकांना रिचार्जचा खर्च परवडणारा नसल्यामुळे शाळेतील शिक्षकांनी गावातील काही पालकांचा ग्रुप तयार केला असून त्या माध्यमातून मोबाईल नसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात जोडून ठेवले आहे.
बहूतांश ठिकाणी शिक्षकांकडून नियमित अभ्यास घेतला जात आहे. अशा परिस्थितीत शिक्षकांच्या बदल्या झाल्यास, त्या शिक्षकांचा गावातील पालकांशी संपर्क तुटणार आहे. नवीन शिक्षकांची ओळख व्हायला आणि पालकांशी समन्वय जुळायला वेळ लागणार आहे. त्यामुळे आपत्तीकाळातील ऑनलाईन शिक्षणाचा बट्टयाबोळ होण्याची शक्यता नाकरता येत नाही.
ऑनलाईनचा आदेश ऑफलाईनकरिता
शासनाच्या २७ फेब्रुवारी २०१७ च्या आदेशानुसार जिल्ह्यातील १५ टक्के शिक्षकांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या होणार आहे. हा आदेश ऑनलाईन बदल्यांसाठी होता. मात्र, तो आता ऑफलाईन बदल्यांसाठी उपयोगात आणल्या जात आहे. या बदल्यांमुळे एकल शिक्षक, सेवा कनिष्ठ व बदली नियमातील सवर्ग ४ च्या शिक्षकांची मोठी अडचण होणार आहे. शासनाने बदल्या कराव्यात पण, कोरोना संकटातील गंभीर परिस्थिती आणि शाळाबंद असताना नकोत, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून केली जात आहे.
चार जिल्ह्यातील बदली प्रक्रिया झाली रद्द
कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता लातूर, सांगली, नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यातील शिक्षक बदली प्रक्रिया रद्द करण्यात आली तर भंडारा जिल्ह्यातील प्रशासकीय बदल्या रद्द करुन विनंती बदल्या करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. पण, वर्धा जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असतानाही शिक्षकांच्या बदल्यांचा अट्टाहास का? असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.
असा आहे बदली कार्यक्रम
जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या कार्यक्रमानुसार २ ऑगस्टला शिक्षकांची जिल्हास्तरीय तात्पुरती यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर ३ व ४ ऑगस्टला त्यावर आक्षेप नोंदविण्याची संधी दिली जाणार आहे. ५ ऑगस्टला आलेल्या आक्षेपावर अधिकाºयांकडून सुनावणी होईल. त्यानंतर अंतिम यादी ६ ऑगस्टला प्रसिद्ध करुन ८ व ९ ऑगस्टला जिल्हा परिषदेच्या सभागृहात शिक्षकांची बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे.
शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील शिक्षकांच्या एकूण संख्येपैकी १५ टक्के शिक्षकांची बदली प्रक्रिया ८ व ९ ऑगस्टला राबविली जाणार आहे. त्याकरिता कार्यक्रमही जाहीर केला असून ही प्रक्रिया पारदर्शक राहणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचे काम डायट व शासनाकडून सुरु असल्याने शिक्षणात कोणतीही बाधा निर्माण होणार नाही.
- डॉ. सचिन ओम्बासे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., वर्धा.
जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविण्यात आली आहे. त्यानुसारच शिक्षकांचीही बदली प्रक्रिया राबविण्यात येईल. यासंदर्भात शिक्षक संघटनांची बैठक बोलावून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. कार्यक्रम जाहीर झाला असला तरी आक्षेप नोंदविण्याची संधी आहेत.
- सरिता गाखरे, अध्यक्ष जि. प., वर्धा.