विविध योजनांतर्गत वृक्ष लागवड; पण संवर्धनाला बगल
By admin | Published: May 30, 2014 12:19 AM2014-05-30T00:19:51+5:302014-05-30T00:19:51+5:30
शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत आजगाव जुने व नवे येथे वृक्ष लागवड करण्यात आली. वायगाव ग्रामपंचायतीमार्फत मुख्य रस्त्याच्या कडेला लावलेली ही झाडे सध्या वाळत असल्याचे दिसते.
वायगाव (नि.) : शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत आजगाव जुने व नवे येथे वृक्ष लागवड करण्यात आली. वायगाव ग्रामपंचायतीमार्फत मुख्य रस्त्याच्या कडेला लावलेली ही झाडे सध्या वाळत असल्याचे दिसते. यामुळे वृक्ष लागवड योजनांवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.
शासनाच्या योजनेनुसार एक व्यक्ती, एक वृक्ष ही संकल्पना राबविण्यात आली. वृक्ष लागवडीवर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करण्यात आले. पंचायत समितीमार्फत सर्व ग्रा.पं. च्या माध्यमातून ही योजना राबविण्यात आली. यात वायगाव (नि.) ग्रा.पं. ने ही वृक्ष लागवड केली. वायगाव अंतर्गत येणार्या वॉर्ड क्र. ३ मधील आजगाव नवीन व आजगाव जुने येथे रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड करण्यात आली. रोजगार हमी योजनेंतर्गत लाकडी कमचीचे कठडेही लावले; पण झाडाला पाणी कोण देणार, हा प्रश्नच होता. संवर्धनाकडे ग्रा.पं. ने दुर्लक्ष केल्याचेच दिसते. झाडांना पाणी न मिळाल्याने बहुतांश झाडे वाळली आहेत. हे दृष्य पाहता शासनाची योजना राबवायची म्हणून झाडे लावण्यात आल्याचे दिसते.
ग्रामपंचायत प्रशासनाकडे झाडाला पाणी देण्याकरिता लोखंडी टाकी उपलब्ध आहे. ही टाकी सध्या धुळखात पडली असताना झाडाला पाणी देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे दिसते. टाकी विकत घेतल्यापासून तिचा वापरच करण्यात आला नसल्याचेही समोर आले आहे. यामुळे झाडांना पाणी देणार्या मजुराची मजुरी तर कागदोपत्री काढली जात नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. झाडाला पाणी दिले जात असेल तर बहुतांश झाडे का वाळत आहेत, हा संशोधनाचा विषय आहे. शतकोटी वृक्ष लागवड योजनेत लावलेली झाडे वाळत असल्याने योजनाच धोक्यात आली आहे. ग्रा.पं. तसेच जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(वार्ताहर)