वर्धा-सेवाग्राम मार्गावरील ती वृक्ष 55 ते 60 वर्ष वयाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 05:00 AM2021-05-23T05:00:00+5:302021-05-23T05:00:20+5:30
सेवाग्राम विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या वर्धा-सेवाग्राम मार्गाचे रुंदीकरण तसेच सिमेंटीकरण करताना रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा येत असल्याचे कारण पुढे करून कंत्राटदाराकडून वृक्षतोडीचा सपाटा लावण्यात आला. ही बाब काही गांधीवाद्यांसह वर्धेतील वृक्षप्रेमींना खटकल्याने त्याला विरोध झाला. तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांना वृक्षप्रेमींनी निवेदन सादर करून तज्ज्ञांकडून चाैकशीची मागणी केली.
महेश सायखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा-सेवाग्राम मार्गावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासह कार्यकर्त्यांनी काही रोपटे लावल्याने सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत वर्धा-सेवाग्राम मार्गाचे रुंदीकरण तसेच सिमेंटीकरण करताना रस्त्याच्या मधोमध येणाऱ्या या वृक्षांचे संवर्धन करण्यात यावे, अशी मागणी करीत वृक्ष बचाव समितीच्यावतीने विकासाच्या नावावर होणाऱ्या वृक्षतोडीला विरोध केला. याच वृक्षांची पाहणी करून देहरादुन येथील तज्ज्ञांनी आपला अहवाल वनविभागाला सादर केला आहे. या अहवालात ही ४३ वृक्ष ५५ ते ६० वयाची असल्याचे नमुद करण्यात आले आहे.
सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत वर्धा शहर आणि सेवाग्राम तसेच पवनार येथे विविध विकास कामे करण्याचे निश्चित करून प्रत्यक्ष कामांला सुरूवात करण्यात आली. सध्या सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत अनेक कामे पूर्ण झाली आहेत. पण सेवाग्राम विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या वर्धा-सेवाग्राम मार्गाचे रुंदीकरण तसेच सिमेंटीकरण करताना रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा येत असल्याचे कारण पुढे करून कंत्राटदाराकडून वृक्षतोडीचा सपाटा लावण्यात आला. ही बाब काही गांधीवाद्यांसह वर्धेतील वृक्षप्रेमींना खटकल्याने त्याला विरोध झाला. तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांना वृक्षप्रेमींनी निवेदन सादर करून तज्ज्ञांकडून चाैकशीची मागणी केली. याच मागणीवर सहानुभूमीपूर्वक विचार होत देहरादून येथील तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. देहरादून येथील तज्ज्ञांनी वर्धा गाठून वर्धा-सेवाग्राम मार्गावरील ४३ वृक्षांची पाहणी केली. शिवाय आपला अहवाल वनविभागाला सादर केला आहे.
तब्बल २७ वृक्ष कडुनिंबाची
nवन संवर्धन तथा प्रबंधन विभाग तसेच वन अनुसंधान संस्थान देहरादुनचे सहायक वन संवर्धन (सामान्य) एस. आर. रेड्डी यांच्या नेतृत्त्वात देहरादून येथील तज्ज्ञांनी वर्धा-सेवाग्राम मार्गावरील एकूण ४३ वृक्षांची पाहणी केली. या ४३ वृक्षांमध्ये कडूनिंबाची २७, बाभुळची १० तर पाच वेगवेगळ्या प्रजातिंच्या सहा वृक्षांचा समावेश आहे. तसे अहवालातही नमुद करण्यात आले आहे.
वृक्ष बचाव समितीने तत्कालीन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार तसेच शासनाकडे आक्षेप नोंदविले असले तरी वेळोवेळी सहकार्य केले आहे. आम्ही केलेल्या पत्रापैकी अनेक पत्रांना शासनाने अजूनही उत्तरे दिलेली नाही. देहरादून येथील तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालाची प्रत वृक्ष बचाव समितीला प्रशासनाने द्यायला हवी. त्याचा आम्ही बानकाईने अभ्यास करू.
- सुषमा शर्मा, सदस्य, वृक्ष बचाव समिती.
वर्धा येथे पाचारण करण्यात आलेल्या देहरादून येथील तज्ज्ञांनी वनविभागाला अहवाल सादर केला आहे. हा अहवाल आम्ही पुढील कार्यवाहीसाठी पाठविला आहे.
- बी. एन. ठाकूर, सहायक वनसंरक्षक, वर्धा.
बाभूळ अन् कडुनिंबाच्या वृक्षांचे वय ५५ ते ६० वर्ष
- देहरादून येथील तज्ज्ञांनी वनविभागाला सादर केलेल्या अहवालात बाभूळ आणि कडुनिंबाच्या वृक्षांचे वय ५५ ते ६० वर्ष असल्याचे नमुद केले आहे. तर २७ वृक्ष ५० सेमी व्यासाची असल्याचे सांगितले आहे. शिवाय ही वृक्ष १९५० ते १९६० मध्ये लावल्याचेही अहवालात स्पष्ट केले असल्याचे वनविभागाच्यावतीने सांगण्यात आले.