वर्धा जिल्ह्यात सुक्या मेव्याचा ट्रक उलटला; गावकऱ्यांनी ८० लाखांचा ऐवज केला लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2020 11:38 AM2020-11-17T11:38:30+5:302020-11-17T11:40:29+5:30
Dryfruits Wardha News काजू, बदाम आदी ड्रायफूड्स भरुन जाणारे वाहन अचानक देववाडी गावाजवळ उलटल्याने गावकऱ्यांनी काजू,बदाम आदी १३ टन सुकामेव्यावर डल्ला मारला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: काजू, बदाम आदी ड्रायफूड्स भरुन जाणारे वाहन अचानक देववाडी गावाजवळ उलटल्याने गावकऱ्यांनी काजू,बदाम आदी १३ टन सुकामेव्यावर डल्ला मारला. हा अपघात नागपूर ते अमरावती मार्गावरील सत्याग्रही घाटात घडला. सुकामेवा भरुन एक ट्रक अमरावतीकडे जात असताना ट्रकचालकाचे वाहनावरुन नियंत्रण सुटल्याने देववाडी गावानजीक अचानक ट्रक रस्त्याकडेला उलटला. या ट्रकमध्ये काजू, बदाम आदी सुकामेवा भरुन होता. ही बाब गावकऱ्यांना लक्षात येताच गावकऱ्यांनी चक्क दिवाळीच्या निमित्ताने सुकामेव्यावर डल्ला मारीत काजू, बदामाची पोती आपआपल्या घरी नेली. गावकऱ्यांनी चक्क ट्रकमधील ८० लाख रुपये किंमतीचा १३ टन सुकामेवा चोरुन नेल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. याची माहिती तळेगाव पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघात झालेल्या ठिकाणाची पाहणी करुन पंचनामा केला. उलटलेला ट्रक काढण्याचे प्रयत्न सुरु आहे. या अपघातामुळे लगतच्या गावांतील नागरिकांसह बघ्यांची गर्दी झाली होती. सुदैवाने या अपघातात कुणाचीही जीवीतहानी झाली नाही.
दंगल पथकाला केले पाचारण
ल्लसुकामेव्यावर गावक ऱ्यांनी डल्ला मारल्याचे पोलिसांना समजताच तळेगाव पोलीस ठाण्यातील दंगल पथकाला अपघातस्थळी पाचारण करण्यात आले. दंगल पथकाने संपूर्ण देववाडी परिसर पिंजून काढला.
७५ टक्के माल केला हस्तगत
ल्लसुकामेवा भरुन असलेला ट्रक उलटल्याने गावकऱ्यांनी ट्रकमधील काजू, बदामाची पोती आपआपल्या घरी नेली. दरम्यान दंगल नियंत्रण पथकातील पोलिसांनी देववाडी गावातील नागरिकांच्या घरोघरी जात तपासणी केली असता नागरिकांच्या घरात सुकामेव्याची पोती मिळून आली. पोलिसांनी अनेकांच्या घरातून सुमारे ७५ टक्के माल हस्तगत केल्याची माहिती आहे. अजूनही पोलिसांचा तपास सुरु असून संपूर्ण माल मिळाल्याशिवाय तपासणी बंद होणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.