साडेचार एकर केळीच्या बागेतून बावीस लाखांचे उत्पन्न; पवनारच्या शेतकऱ्याचे धाडस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 02:17 PM2018-02-08T14:17:04+5:302018-02-08T14:17:23+5:30
पवनार येथील युवा शेतकऱ्याने केवळ साडेचार एकर शेतात तब्बल २२ लाख रुपयांचे उत्पादन घेत विक्रमच केला आहे. या शेतकऱ्याने केळीची बाग फुलविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पारंपरिक पिके सोडून शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरली आहे. यातूनच युवा शेतकरी अन्य शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण करीत असल्याची उदाहरणे आहेत. सध्या पवनार येथील युवा शेतकऱ्याने केवळ साडेचार एकर शेतात तब्बल २२ लाख रुपयांचे उत्पादन घेत विक्रमच केला आहे. या शेतकऱ्याने केळीची बाग फुलविली आहे.
पवनार येथील शेतकरी कुंदन वाघमारे यांनी ५ मार्च २०१७ रोजी आपल्या साडे चार एकर शेतात केळीची लागवड केली होती. केळीचा बागायतदार तालुका म्हणून ओळख असलेल्या सेलूतून केळीचे पीक हद्दपार झाल्याची ओर होत आहे. असे असताना वाघमारे यांनी पवनार येथील आपल्या शेतात केळीची बाग तयार करण्याची किमया साध्य केली आहे. अकरा महिने परिश्रम घेतल्यानंतर त्यांना विक्रमी उत्पादन घेता आले आहे. सध्या त्यांच्या साडे चार एकर शेतात केळीची ६ हजार ८०० झाडे आहेत. प्रत्येक झाडाला केळीचे घड लागलेले आहेत. एका घडाचे वजन सुमारे २८ किलो झाले आहे. सध्या बाजारपेठेत केळीच्या घडाला १२ रुपये किलोप्रमाणे भाव मिळत आहेत. एकूण हिशेब लक्षात घेतला तर त्यांना तब्बल २२ लाख ८४ हजार रुपयांचे उत्पन्न या साडे चार एकर शेतातून मिळणार आहे.
शेतकऱ्यांनी आधुनिक शेती केल्यास उत्पादन व जीवनमान उंचावता येते, हे वाघमारे यांनी सिद्ध केले आहे. पारंपरिक पिकांची कास धरून त्यांना केवळ साडे चार एकर शेतात कधीही एवढे उत्पन्न घेता आले नसते; पण केळीची बाग फुलविण्याचे धाडस केल्याने केवळ वर्षभरात त्यांना २२ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होऊ शकले आहेत. वाघमारे यांनी शासकीय नोकरी सोडून शेती पत्करली; पण अन्य शेतकरी पारंपरिक पिकांवरच भर देत असल्याने नापिकीचा सामना करावा लागतो. अन्य शेतकऱ्यांनी सुविधा प्राप्त करून घेत आधुनिक शेतीची कास धरणे गरजेचे झाले आहे.
प्रयोगशीलता हवी
पारंपरिक पद्धतीने शेती केल्यास शेतकऱ्याला फारसे उत्पन्न मिळत नाही; पण शेतीत प्रयोगशीलता गरजेची आहे. विविध प्रयोग राबवून व्यवसाय म्हणून शेती केल्यास शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवून जीवनमान उंचाविणे शक्य होऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांनी अनुकरण करणे गरजेचे आहे.