लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विदर्भवादी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 01:56 PM2019-01-15T13:56:29+5:302019-01-15T14:06:07+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भवादी नेते आक्रमक झाले असून स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याचे आश्वासन देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने वैदर्भीय जनतेची फसवणूक केली असल्याचा आरोप करीत संपूर्ण विदर्भात १ हजार सभांचे नियोजन विदर्भवाद्यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भवादी नेते आक्रमक झाले असून स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याचे आश्वासन देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने वैदर्भीय जनतेची फसवणूक केली असल्याचा आरोप करीत संपूर्ण विदर्भात १ हजार सभांचे नियोजन विदर्भवाद्यांनी केले आहे. विदर्भ राज्य द्या, अन्यथा खुर्च्या खाली करा, असा निर्वाणीचा इशारा विदर्भवाद्यांनी दिला आहे. अलीकडेच २ ते १२ जानेवारी या कालावधी विदर्भ संघर्ष यात्रा काढण्यात आली. त्यानंतर आता ग्रामीण भागात १ हजार सभांचे नियोजन करण्यात आले आहे. या आंदोलनासाठी विदर्भवाद्यांच्या सर्व संघटना एकत्र आल्या असून आगामी निवडणुकीत विदर्भवाद्यांचे उमेदवारही मैदानात उतरविले जाण्याची शक्यता विदर्भवादी नेत्यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र राज्याची निर्मिती करताना स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला मूठमाती देण्यात आली. विदर्भाची मागणी दीडशे वर्षांपूर्वीची असून काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षाने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला समर्थन दिले होते. भाजप व काँग्रेसने अनेकदा स्वतंत्र राज्याबाबत ठरावही पारित केले. मात्र, आपला शब्द पाळला नाही. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी भाजपने व त्यानंतरही भाजपच्या नेत्यांनी स्वतंत्र राज्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र, आता भाजप स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्यांपासून दूर गेला आहे, असा आरोप विदर्भवादी नेते अॅड. वामनराव चटप यांनी केला आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सध्या विदर्भ राज्याचा मुद्दा भाजपच्या अजेंड्यांवर नसल्याचा दावा केल्याचे चटप यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
दुसरीकडे अॅड. श्रीहरी अणे यांच्या नेतृत्वात विदर्भवादी आक्रमक झाले असून वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत वडनेर, हिंगणघाट, जाम, सावली वाघ आदी भागासह विविध ठिकाणी जाहीर सभा विदर्भ राज्य आघाडीच्यावतीने घेतल्या जात आहेत. विदर्भवाद्यांच्या आक्रमकपणामुळे आगामी काळात भारतीय जनता पक्षाची मोठी गोची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार आहे.
विदर्भ राज्य झाल्याशिवाय शेतकºयांची लूट थांबणार नाही. दिल्ली, मुंबईच्या नेत्यांना विदर्भाच्या जनतेशी काहीही देणे-घेणे राहिले नाही. महाराष्ट्र राज्यात सामील झाल्यामुळे विदर्भाची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे आगामी काळात विदर्भ राज्य निर्माण झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.
अनिल जवादे, उपाध्यक्ष, विदर्भ राज्य आघाडी,
२०१४ मध्ये विदर्भ राज्य देऊ या मुद्यांवर भाजपचे ४४ आमदार व ६ खासदार निवडून आले. सत्तेवर आल्यावर विदर्भाचा त्यांना विसर पडला. विदर्भ वेगळा झाला तर महाराष्ट्राला वीज, कापूस, खनिज मिळणार नाही.
नीरज खांदेवाल, विदर्भवादी नेते.