अरुण फाळके - कारंजा (घा़)
एकेकाळी विदर्भाचे वैभव समजल्या जाणार्या तालुक्यातील हेटीकुंडी येथील शासकीय पशुपैदास केंद्राला सध्या अखेरची घरघर लागली आहे़ शासनाचे दुर्लक्ष, कर्मचार्यांची निष्क्रीयता आणि लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेचा परिणाम म्हणून राज्यातील आठ केंद्रांपैकी एक असलेले हे केंद्र अखेरच्या घटका मोजत आहे़ हे विदर्भ वैभव वाचविण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे़ इंग्रजांच्या काळात १९४६ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे लाखो रुपये खर्च करून हे केंद्र निर्माण केले गेले़ वर्धा जिल्ह्याचा मानबिंदू म्हणून विशेषत्वाने निर्माण झालेल्या या केंद्रावर सध्या मरगळ आली आहे़ ही निश्चितच जिल्हा प्रशाासनासह महाराष्ट्र शाासनाला शरमेने मान खाली घालायला लावणारी बाब आहे़ प्रचंड धनसंपदा वापरून गवळावू प्रजातीच्या पशुंचे जतन, संवर्धन, विकास करण्याचा हेतूने बांधलेल्या कार्यालयीन इमारती, सुसज्ज गायी-वासरांचे गोठे, वैरण कोठ्या, कर्मचार्यांची घरे, आज जमीनदोस्त झाली आहेत़ एकेकाळी निसर्ग सौंदर्य आणि नवनिर्मितीचा आनंद देणार्या या परिसरात पशुविकास होण्याऐवजी परिसरच भकास झाल्याचे दिसते़ येथे केवळ गवळावू प्रजातीच्या गायी आणि वासरांचे संवर्धन केले जात आहे़ हेटीकुंडी केंद्राला लागून घनदाट जंगल व निसर्ग सौंदर्य लाभले होते़ स्वत:च्या मालकीची ३२८ हेक्टर सुपिक जमीन आणि १० हेक्टर परिसरात बांधलेल्या पाच कार्यालयीन सुसज्ज इमारती, दोन सभागृह, दोन गेस्ट हाऊस, २० कर्मचार्यांची निवासस्थाने, सर्व सुविधांनी संपन्न चार गोठे, तीन चारा कोठ्या होत्या़ शेतकर्यांचे विशेष प्रशिक्षण होत असे़ आज हे वैभव नष्ट होण्याच्या मार्गावर आहे़ पडक्या इमारतीत कुत्रे, मांजरे, वन्य प्राणी आढळतात़ झाडे, झुडपे वाढून स्मशानावस्था आली आहे़ पुरेसा चारा नसल्याने गोधनाची शारीरिक प्रकृती चिंताजनक आहे़ या गोधनाच्या देखभालीसाठी एकेकाळी २० स्थायी मजूर, ३ एलएलएस, ६ पशुधन विकास अधिकारी, १ सहायक वैरण अधिकारी, १ कनिष्ठ व वरिष्ठ लिपिक तसेच एक अधिकारी असा १८ कर्मचार्यांचा ताफा होता; पण आज केवळ एक एलएलएस व चार मजूर, असे ५ कर्मचारी कार्यरत आहेत़ वैरण अधिकारी, ३ सहायक पशुविकास अधिकार्यासह २३ जागा रिक्त आहेत़ कर्मचारी कमी असल्याने गायींची शास्त्रशुद्ध देखभाल होत नाही़ भरपूर वैरण नसल्याने गायी, वासरे हाडकुळे झालीत़ पडक्या इमारतीत कार्यालय सुरू आहे़ एकही कर्मचारी वा चौकीदार निवासी राहत नसल्याने गोधन रामभरोसेच असते़ याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे़