ग्रामस्थांनी बंद पाडले रस्त्याचे निकृष्ट बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2015 02:32 AM2015-05-24T02:32:09+5:302015-05-24T02:32:09+5:30
मदनी आमगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मदनी येथील सिमेंट रस्ता बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात होते.
आकोली : मदनी आमगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मदनी येथील सिमेंट रस्ता बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात होते. ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच ग्रामसेविकाला मोक्यावर बोलवून काम बंद पाडण्यात आले. याबाबत ग्रामसेविकेने शाखा अभियंत्यांनाही माहिती दिली.
माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांनी आमदार निधीतून मदना बायपास ते जि.प. प्राथमिक शाळेपर्यंत सिमेंट रस्ता बांधकामाकरिता चार लाख रुपये मंजूर केले होते. तेव्हापासून कामाचे भिजत घोंगडे होते. अखेर कंत्राटदाराला जाग आली व कामास प्रारंभ झाला. रस्ता कामात गिट्टी ऐवजी विहिरीच्या खोदकामातून निघालेले दगडाचे चिपाड वापरले जात होते. प्राकलनाप्रमाणे काम न करता सिमेंटचा अत्यल्प वापर केला जात असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. निकृष्ट दर्जाचे काम हाणून पाडण्याकरिता ग्रामस्थांनी एकजूट करीत काम बंद पाडले.
यानंतर ग्रामसेविका जया राठोड यांना पाचारण करण्यात आले. सदर गैरप्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. राठोड यांनी पं.स. शाखा अभियंता खरवडे यांना माहिती दिली असता त्यांनी ४ वाजेपर्यंत येतो, असे सांगितले. ग्रामस्थ त्यांची प्रतीक्षा करीत थांबले; पण सायंकाळपर्यंत ते मदनी गावाकडे फिरकले नाही. यामुळे कंत्राटदाराशी साटेलोटे असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत जि.प. स्तरावरून अभियंत्यामार्फत सर्वच कामांची सर्वंकष चौकशी करावी व रस्त्यांचा दर्जा राखावा, अशी मागणीही मदनी येथील नागरिकांनी केली.(वार्ताहर)