लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : शहरातील वाहनांची वाढती संख्या आणि बकाल झालेले रस्ते, यामुळे वाहतुकींची कोंडी होत आहे. त्यातच अतिक्र मणानेही भर घातल्याने वाहतूक नियम धाब्यावर बसवून वाहने दामटविली जात आहे.शहरातील शिवाजी चौकापासून गांधी चौकाकडे जात असलेल्या रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पायी चालणाऱ्यांकरिता रस्ता असूनही रस्ता नसल्यासारखी स्थिती झाली आहे. दुकानासमोर रस्त्यापर्यंत वाहने उभे केली जात असल्यामुळे व हातगाडी विक्रेत्यामुळे रस्त्यावर वाहने चालविणेच नाही तर पायी चालणेही कठीण झाले आहे. शिवाजी चौकाकडून देऊरवाडाकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दैयनीय अवस्था झाली आहे. अतिक्रमणामुळे अमरावतीकडे जाणारा हा मुख्य रस्त्यांवर वाहनांची गजबज असते. त्यामुळे अमरावतीकडे जाताना नागरिकांना अनेक अडथळे पार करावे लागतात. शिवाजी चौकाकडून बसस्थानकाकडे येतांना रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या राहत असलेल्या वाहनांच्या रांगेतून रस्ता शोधावा लागतो.आर्वी शहरातील प्रत्येकच मुख्य चौकाची स्थिती ही रस्ता कमी, मात्र उभ्या वाहनांची संख्या जास्त अशी झाली आहे. एकेकाळी नेहरु मार्केटच्या प्रत्येक गल्लीतून ट्रक जात होता. आज तेथून मोटरसायकल किंवा सायकल चालविणेही कठीण झाले आहे. नेहरु मार्केट परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूने फुटपाथवर अनेकांनी आपली दुकाने थाटली आहे. या परिसरात खरेदी करिता जाणाऱ्यांंना तारेवरची कसरत करावी लागते. शहरात पार्किंगची सोय नसल्याने वाट्टेल तिथे वाहनचालक आपली वाहने उभी करुन मोकळे होतात. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होऊन शहरातील अनेक ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले आहे.बसस्थानक समोरील एलआयसी कार्यालयासमोर आॅटो, काळीपिवळी व ट्रक रस्त्याच्या बाजूला उभे केले जातात. त्यामुळे वसंतनगर येथून येणाºयांना मुख्य रस्त्यावरुन येणारे वाहन दिसत नाही. यात अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. तसेच साईनगराकडे जाणाºया रस्त्यावर चौकातच हॉटेल समोर वाहने उभी असतात. त्यामुळे येथेही वाहतुकीचा पचकाच होत आहे. सायंकाळी उभ्या असलेल्या तरुणांच्या गर्दीमुळे व शासकीय विश्राम गृहासमोरही मोठ्या प्रमाणात वाहने उभी राहात असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे.शहरातील रस्ते मोठे करणे अशक्य असल्याने वाहतुकीची कोंडी सोडविण्याकरिता पोलीस प्रशासन, नगरपालिका यांनी उपाययोजना करण्याची गरज आहे. वाढती लोकसंख्या परिणामी वाढती वाहनांची संख्या यामुळे शहरातील गर्दी वाढतच असल्याने अरुंद आणि अतिक्रमित रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. अपघात टाळण्यासाठी प्रशासनाला नागरिकांनीही सहकार्य करण्याची गरज सूज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
शहरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 11:46 PM
शहरातील वाहनांची वाढती संख्या आणि बकाल झालेले रस्ते, यामुळे वाहतुकींची कोंडी होत आहे. त्यातच अतिक्र मणानेही भर घातल्याने वाहतूक नियम धाब्यावर बसवून वाहने दामटविली जात आहे.
ठळक मुद्देअतिक्रमणामुळे अडचणीत भर : अपघाताची शक्यता बळावल्याने नागरिक चिंतेत