विदर्भवादी नेत्यांवरील हल्ल्याचा निषेध
By admin | Published: September 19, 2016 12:54 AM2016-09-19T00:54:20+5:302016-09-19T00:54:20+5:30
मुंबई येथे मंगळवारी विदर्भवादी नेत्यांच्या पत्रकार परिषदेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी गुंडगिरी केली.
हिंगणघाट : मुंबई येथे मंगळवारी विदर्भवादी नेत्यांच्या पत्रकार परिषदेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी गुंडगिरी केली. या घटनेचा विदर्भ राज्य परिषदेने निषेध नोंदविला. शिवाय त्यांच्यावर व्यक्ती व विचार स्वातंत्र्य दडपण्याचा गुन्हा दाखल करून कार्यवाही करावी, अशी मागणी केली. याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
राज्य घटनेने प्रत्येक भारतीयाला दिलेल्या विचार व व्यक्ती स्वातंत्र्याचा गुंडगिरीने अनादर करीत मंगळवारी मुंबई येथे विदर्भवादी नेते अॅड. वामनराव चटप, ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ श्रीनिवास खांदेवाले, अॅड. नंदा पराते, धार्मिक यांच्या पत्रकार परिषदेत धुडगूस घालून ती बंद पाडणे व ज्येष्ठ नेत्यांना धमकाविण्याचा प्रयत्न केला. मराठी भाषिकांची संघटना म्हणून बिरूद लावणाऱ्यांना मराठी भाषिकांच्या एका कुटुंबाचा पक्ष फोडून स्वत:च्या राजकारणासाठी दोन पक्ष निर्माण करता येतात. देशात हिंदी भाषिकांचे असंख्य राज्य आहे. मराठी भाषिकांचे दोन राज्य का सहन होत नाही, हा प्रश्न आहे. मनसेच्या गुंडगिरी करणाऱ्या नेत्यांशी विदर्भाच्या मुद्यावर खुली चर्चा करण्यास विदर्भवादी तयार आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करावी, अशी मागणी साहेबराव येंडे, उल्हास कोटमकर, शेषराव तुळणकर, सुनील हिवसे, डॉ. अरुण सावकार, प्रमोद श्रीरामे, संजय बांगडे, गंगाधर बांगडे, भगत, लाखे आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)