वर्ध्याला मिळाला राष्ट्रीय पातळीवरील स्कोच पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 04:00 PM2020-08-01T16:00:23+5:302020-08-01T16:00:52+5:30
सर्वत्र कोरोनाचे रुग्ण आढळत असताना वर्धा जिल्ह्याने सुरूवातीला ५० दिवस कोरोनाला जिल्ह्यात दाखल होऊ दिले नाही. कोविडला प्रतिसाद या गटात वर्धा जिल्हा अव्वल ठरल्याने स्कोच अवार्ड जिल्ह्याला मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वधार् : स्कोच या संस्थेद्वारे राष्ट्रीय पातळीचा पुरस्कार वर्धा जिल्ह्याला देण्यात आला आहे. कोविडला प्रतिसाद या गटात वर्धा जिल्हा अव्वल ठरल्याने स्कोच अवार्ड वर्धा जिल्ह्याला मिळाला असल्याचे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितले आहे.
सर्वत्र कोरोनाचे रुग्ण आढळत असताना वर्धा जिल्ह्याने सुरूवातीला ५० दिवस कोरोनाला जिल्ह्यात दाखल होऊ दिले नाही. शिवाय विविध उपाय योजना केल्या. स्कोच पुरस्काराच्या स्पर्धेत उडी घेतल्यावर ऑनलाईन पद्धतीचा वापर करून झालेल्या बैठकीत वर्धा जिल्ह्यात काय प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात आल्या याची माहिती देण्यात आली. पहिली फेरी, दुसरी फेरी असे करीत वर्धा जिल्हा या पुरस्कारासाठी अंतीम फेरीत पोहोचला. पीपीटीद्वारे अंतीम फेरीत उत्कृष्टपणे सादरीकरण केल्यानंतर वर्धा जिल्ह्याला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
नवीन सोना यांच्या कार्यकाळातही मिळाला होता बहुमान
जिल्हाधिकारी नवीन सोना यांच्या कार्यकाळात वर्धा जिल्ह्याला स्कोच अवार्ड प्राप्त झाला होता. त्यावेळी डीबीटी प्रणालीत उत्कृष्ट काम केल्यामुळे वर्धा जिल्ह्याला हा बहुमान प्राप्त झाला होता तर आता जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या कार्यकाळात वर्धा जिल्ह्याला पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावरील हा पुरस्कार प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.