वर्धा बनतेय गांजा तस्करीचे ‘हब’

By Admin | Published: March 2, 2017 12:25 AM2017-03-02T00:25:39+5:302017-03-02T00:25:39+5:30

रेल्वे प्रवासाच्या दृष्टीने वर्धेतील सेवाग्राम महत्त्वाचे स्टेशन आहे. येथून चारही दिशेला जाणाऱ्या रेल्वे गाड्या उपलब्ध आहेत.

Wardha's Banana Trafficking 'Hub' | वर्धा बनतेय गांजा तस्करीचे ‘हब’

वर्धा बनतेय गांजा तस्करीचे ‘हब’

googlenewsNext

रेल्वे पोलिसांकडूनच सर्वाधिक कारवाया : वर्षभरात तब्बल दोन क्विंटल गांजा जप्त
महेश सायखेडे  वर्धा
रेल्वे प्रवासाच्या दृष्टीने वर्धेतील सेवाग्राम महत्त्वाचे स्टेशन आहे. येथून चारही दिशेला जाणाऱ्या रेल्वे गाड्या उपलब्ध आहेत. देशभर पसरलेल्या रेल्वेच्या जाळ्याचा अनेक अवैध व्यवसायाकरिता होत आहे. याच जाळ्याच्या माध्यमातून वर्धेत मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होत असल्याचे पोलिसांच्या कारवाईवरून समोर आले आहे. वर्षभरात रेल्वे पोलिसांनी तब्बल दोन क्विंटल गांजा जप्त केल्याने वर्धा आता गांजा तस्करीचे ‘हब’ बनत असल्याचेच चित्र आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली. त्या काळात रेल्वेतून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी झाल्याचे पोलिसांच्या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. या कारवाईत आरोपी नव्हते; पण गांजाच्या तस्करीत पोलिसांना आरोपी सापडले असून त्यांनी आंध्रातून हा गांजा आणल्याचे कबूल केले आहे. आंध्रातून गांजा आणून तो वर्धेत उतरवायचा आणि येथून अमरावती, अकोला या भागात चिल्लर स्वरूपात विकायचा, असे या व्यवसाचे स्वरूप असल्याचे समोर आले आहे.
गांजाची माहिती मिळताच बुट्टीबोरी ते बडनेरापर्यंत रेल्वेची हद्द असलेल्या वर्धा लोहमार्ग पोलिसांनी १५ कारवाया केल्या. या कारवाईत त्यांनी एकूण २०० किलो गांजा जप्त केला. याची किंमत १८ लाख ४८ हजार ९२० रुपये असल्याचे समोर आले आहे. यात त्यांनी १० आरोपींना अटक केल्याची माहिती आहे. पोलिसांनी एवढ्या कारवाया केल्या असताना वर्धेत अनेक ठिकाणी गांजाचा धूर निघताना दिसून येतो. रेल्वे पोलिसांच्या तुलनेत महाराष्ट्र पोलिसांकडून होणाऱ्या कारवाया थातुरमातूर असल्याचे दिसून आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, जिल्हा पोलिसांनी जानेवारी २०१६ ते २०१७ या बारा महिन्यांमध्ये चार ठिकाणी कारवाई करीत ३ लाख ५९ हजार १८० रुपयांचा ४४.१२१ किलो गांजा जप्त केला. वर्धा पोलिसांनी केलेल्या चार कारवाईमध्ये नऊ आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. वर्षभरात वर्धा पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला असला तरी सध्या सुरू असलेल्या गांजा विक्री व्यवसायाच्या तुलनेत या कारवाया कमीच आहे. पोलीस यंत्रणेने शहरातील अड्डे धुंडाळणे गरजेचे झाले आहे.

अमरावती, अकोला येथे वर्धा शहरातून तस्करी
वर्धेत पकडलेल्या आरोपींमध्ये सर्वाधिक आरोपी अमरावती येथील असल्याचे समोर आले आहे. या आरोपींकडून आंध्रप्रदेशातून गांजा आणला जातो. तो अमरावती येथे नेऊन विकण्याचा व्यवसाय असल्याचेही समोर आले आहे. अमरावती येथून हा गांजा अकोला शहरापर्यंत जात असल्याची माहिती आहे. गांजा तस्करीचे नेटवर्क दोन-तीन राज्यांत पसरले असून रेल्वे स्थानक व गाड्यांत होणाऱ्या कारवाईतूनच ही बाब समोर येते.

वर्धेत अनेक ठिकाणी गांजाचा धूर
शहरात गांजाची तस्करी जोरात सुरू आहे. पोलिसांकडून आजपर्यंत केवळ बाहेरून गांजा आणणाऱ्या तस्करांवरच कारवाई झाल्याचे दिसते. शहरातील गांजांच्या अड्ड्यांकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होत आहे. वर्धा रेल्वे स्थानक परिसरासह शहरातील जीर्ण इमारतींमध्ये दररोज गांजाचा धूर निघतो. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असून वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

१९ आरोपींना अंमली पदार्थांच्या तस्करीत अटक
वर्धा लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा बल तसेच जिल्हा पोलिसांनी जानेवारी २०१६ ते फेब्रुवारी २०१७ पर्यंत १५ वेळा कारवाई केली. यातील चार कारवाई जिल्हा पोलिसांनी केल्या तर ११ कारवाई रेल्वे पोलिसांच्या आहे. यात एकूण १९ आरोपींना अटक केली आहे. यातील १० आरोपी रेल्वे तर नऊ आरोपी जिल्हा पोलिसांच्या कारवाईतील आहेत. या १९ आरोपींकडून १९३.९५ किलो गांजा जप्त करण्यात आला. त्याची किंमत १८ लाख ४८ हजार रुपये आहे. अकरा पैकी सहा कारवाईत ७५.३०८ किलो गांजा बेवारस आढळून आला आहे. यामुळे रेल्वेतून होत असलेल्या गांजाच्या तस्करीवर आळा बसविण्याची मागणी जोर धरत आहे.

Web Title: Wardha's Banana Trafficking 'Hub'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.