शिळ्या अन्नविसर्जनामुळे बोर नदीपात्रात जलप्रदूषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 05:00 AM2020-03-06T05:00:00+5:302020-03-06T05:00:24+5:30
बोर नदीपात्रात याआधीही महाप्रसादातील शिळे अन्न टाकण्यात आले होते. त्या अन्नावर ताव मारल्याने अनेक जनावरांना विषबाधा होऊन आपला जीव गमवावा लागला होता. याप्रकरणी पोलिसांत अनेकांवर गुन्हा देखील दाखल झाला होता. मात्र असे असले तरी लोक त्या घटनेपासून काडीचाही बोध घ्यायला तयार नाहीत. येथील नदीच्या जुन्या पुलावर वाहन उभे करून दिवसाढवळ्या शिळे अन्न नदीपात्रात विसर्जित केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : येथील बोर नदीपात्रात शिळ्या अन्नाचे विसर्जन केले जात असल्याने नदीकाठावरील जलस्रोत प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. या प्रकाराकडे प्रदूषण नियामक मंडळाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सेलू येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
बोर नदीपात्रात याआधीही महाप्रसादातील शिळे अन्न टाकण्यात आले होते. त्या अन्नावर ताव मारल्याने अनेक जनावरांना विषबाधा होऊन आपला जीव गमवावा लागला होता. याप्रकरणी पोलिसांत अनेकांवर गुन्हा देखील दाखल झाला होता. मात्र असे असले तरी लोक त्या घटनेपासून काडीचाही बोध घ्यायला तयार नाहीत. येथील नदीच्या जुन्या पुलावर वाहन उभे करून दिवसाढवळ्या शिळे अन्न नदीपात्रात विसर्जित केले जात आहे. नदीपात्रातील त्या अन्नाच्या कुजण्यामुळे नदीकाठावरील जलस्त्रोतांना जलप्रदूषणाचा धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. शिवाय नदीपात्रातील जलचर जिवांना सुद्धा जिवाणूमुळे बाधा होऊ शकते. शहरात अनेक मंगल कार्यालयांजवळ अशाप्रकारे शिल्लक व शिळे अन्न टाकल्या जाते. त्यावर डुक्कर येथेच्छ ताव मारतात नंतर होणाऱ्या दुगरंधीचा सामना नागरिकांना करावा लागतो. याकरिता संबंधितानी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. परंतु आता तर शिळ्या अन्नाच्या विसर्जनाकरिता लोकांनी थेट नदीपात्राचाच आधार घेणे सुरू केले आहे.
उद्देश जरी चांगला असला तरी जलप्रदूषणाचा धोका लक्षात घेता सदर प्रकार उचित नाही. यामुळे नदीकाठावरील पिण्याच्या पाण्याचे जलस्त्रोत प्रदूषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय जिवामुमुळे जलचर प्राण्यांना देखील यापासून संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो.