वर्ध्यात येऊन गांधी आश्रमभेटीची इच्छा पूर्ण झाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 11:47 AM2020-07-27T11:47:32+5:302020-07-27T11:48:02+5:30
अनेक वर्षांपासून सेवाग्राम येथील आश्रमाला भेट देण्याची इच्छा होती. आजच्या वर्धा दौऱ्यात ती इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केले.
दिलीप चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : सेवाग्राम येथील गांधी आश्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी रविवारी भेट देत आश्रमातील कार्याची माहिती जाणून घेतली. अनेक वर्षांपासून सेवाग्राम येथील आश्रमाला भेट देण्याची इच्छा होती. आजच्या वर्धा दौऱ्यात ती इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे, सुमारे दीड तासांचा वेळ राज्यपालांनी गांधी आश्रमात घालविला.
राज्यपाल कोश्यारी यांचे दुपारी १ वाजता आश्रमात आगमन होताच आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू व मंत्री मुकुंद मस्के यांनी सूतमाळ, बापू की आत्मकथा, इंडिया माय ड्रीम व हिंद स्वराज ही पुस्तके देऊन त्यांचे आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने स्वागत केले.
त्यानंतर राज्यपालांनी आदी निवास, बा-कुटी, बापू कुटी, बापू दप्तर, आखरी निवास आदी स्मारकांना भेट देत माहिती जाणून घेतली. स्मारक तसेच आश्रमातील कार्याची माहिती प्रभू यांनी दिली. बापू कुटीत सर्वधर्म प्रार्थना झाली. या प्रसंगी पालकमंत्री सुनील केदार, खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, आ. दादाराव केचे, आ. समीर कुणावार, सरपंच सुजाता ताकसांडे, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार प्रीती डुडुलकर आदींची उपस्थिती होती.
भेटवहीत नोंदविला अभिप्राय
बापू व विनोबा यांच्या साधनास्थळी येण्याची संधी मिळाली. साधेपणा, शांती, आत्मनिर्भरतेचा आभास या ठिकाणी होत आहे. या पवित्र तीर्थस्थळी युवाशक्तींचे भ्रमण व्हावे. नवीन पिढीने बापूंनी सांगितलेल्या मार्गावर चालल्यास सर्वच्या सर्व देशी, सर्व भाषा आणि आत्मनिर्भर बनविण्याच्या बापूंच्या स्वप्नांना साकार करू शकतील. प्रवचक, साधक आहे, भगिनींना सादर प्रणाम! असा अभिप्राय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आश्रमातील भेटवहीत नोंदविला.
रसोड्याच्या शेजारी घेतला जेवणाचा आस्वाद
आश्रमातील रसोड्याच्या बाजूच्या ठिकाणी टेबल-खुर्ची लावून राज्यपालांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. याच ठिकाणी राज्यपाल कोश्यारी यांनी मिक्स भाजी, आलू-वांग्याची भाजी, पुरण, वरण-भात, मठ्ठा, सलाद आणि चटणीचा आस्वाद घेतला. तसेच आश्रम भेटीदरम्यान राज्यपाल कोश्यारी यांनी खादीच्या कपड्यांची खरेदी केली. काही वेळ त्यांनी आश्रमच्या कार्यालयात घालवून लोकप्रतिनिधींशी संवाद साधला.
राज्यपालांनी व्यक्त केली खंत
पत्रकारांशी संवाद साधताना टी. आर. एन. प्रभू म्हणाले, अनेक दिवसांची गांधीजींच्या आश्रमात येण्याची इच्छा या भेटीतून पूर्ण झाली. नवी पिढी गांधी- विनोबांच्या विचारांकडे वळत नसल्याची खंत राज्यपालांनी व्यक्त केल्याचे प्रभू यांनी सांगितले. लॉकडाऊन शासनाचा निर्णय आहे. आश्रम पर्यटकांसाठी बंद आहे. अशातच राज्यपालांनी भेट दिली. ते अती महत्त्वाचे व्यक्ती असल्याने ते आश्रमात आले. आश्रम सर्वांचे असून या ठिकाणी येणाऱ्यांचे स्वागत आहे, असेही प्रभू यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.