मायक्रो फायनान्स कंपनीविरूद्ध महिलांचा एल्गार
By admin | Published: March 2, 2017 12:27 AM2017-03-02T00:27:28+5:302017-03-02T00:27:28+5:30
मायक्रो फायनान्स कंपन्यांनी शासकीय नियम डावलत कर्ज वाटप केले. ग्रामीण तथा शहरी भागातील महिलांनी कर्जही घेतले;
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : ‘कर्जमुक्त, भयमुक्त व सशक्त महिला’चा नारा
वर्धा : मायक्रो फायनान्स कंपन्यांनी शासकीय नियम डावलत कर्ज वाटप केले. ग्रामीण तथा शहरी भागातील महिलांनी कर्जही घेतले; पण कंपन्यांनी अवाढव्य व्याज व कर्जाची मूळ रक्कम वसूल करण्याचा सपाटा लावला. यामुळे सदर कर्ज माफ करण्याच्या मागणीसाठी बुधवारी महिलांनी एल्गार पुकारला. बजाज चौकातून मोर्चाद्वारे महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
आधार संघटना व विदर्भ राज्य आघाडीच्या नेतृत्त्वात जिल्हा कचेरीवर काढण्यात आलेल्या मोर्चाच्या माध्यमातून महिलांनी ‘कर्जमुक्त महिला-भयमुक्त महिला-सशक्त महिला’चा आवाज बुलंद केला. या मोर्चाचे नेतृत्त्व कामगार नेते भास्कर इशापे, अमोल कठाणे, राजाभाऊ लोहकरे, विजय वाखनेडे, श्रीकांत दौड, स्वप्नील देशमुख, अस्लम शेख, नरेंद्र पहाडे, संजय झाडे, प्रणिता वानखेडे, रूखसार फिरोज शेख, मोहन भागवत यांनी केले. बजाज चौकातून दुपारी १ वाजता निघालेला मोर्चा दुपारी २.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. न्यायालय परिसरात मोर्चा अडविल्यानंतर सभा झाली. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत मागण्यांचे निवेदन सादर केले. मोर्चात जिल्ह्यातील विविध भागातील महिला सहभागी झाल्या होत्या.(शहर प्रतिनिधी)
कर्जाबाबत संभ्रम कायमच
मायक्रो फायनान्स कंपन्यांचे कर्ज हे रिझर्व्ह बँकेचे आहे. यामुळे ते माफ होऊ शकत नाही, असा तगादा संबंधित कंपन्या तथा साधन या फायनान्स कंपन्यांचे संचालन करणाऱ्या संस्थेने लावला आहे. यामुळे कर्जमाफी होणार की नाही, याबाबत संभ्रम आहे.
चोख पोलीस बंदोबस्त
कर्जमुक्तीसाठी बजाज चौक येथून निघालेल्या मोर्चात अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त केला होता. यामुळे बजाज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्ग काही वेळासाठी पोलीस छावणीच झाला होता.