पं.स. सभापतींना स्थान : दोन सदस्य गैरहजर वर्धा : जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आल्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्षांसह चार सभापतींची निवड करण्यात आली. दोन सभापतींचे खातेवाटप तथा स्थायी समितीसह नऊ समित्या गठित व्हायच्या होत्या. यामुळे बुधवारी सर्वसाधारण सभा घेत दोन सभापतींना खातेवाटप करण्यासह समित्यांचे गठण करण्यात आले. यंदा पहिल्यांदाच पं.स. सभापतींना समितीत सदस्यत्व देण्यात आले. शिवाय विरोधी पक्षातील सदस्यांनाही या समित्यांमध्ये स्था दिले गेले. जिल्हा परिषदेच्या सभागृहात जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांच्या अध्यक्षतेत सर्वसाधारण सभा पार पडली. सभेला भाजप गटनेत्या सरोज माटे व सदस्य शरद सहारे वगळता उर्वरित ५० सदस्यांची उपस्थिती होती. यात भाजपचे २९, रिपाइं १, शिवसेना २, राष्ट्रवादी काँग्रेसचे २, काँग्रेस १३ व अपक्ष १ यांचा समावेश होता. यावेळी बांधकाम व वित्त, पशुसंवर्धन व कृषी, शिक्षण व आरोग्य आणि महिला व बालकल्याण समित्यांच्या सभापतींना खातेवाटप करण्यात आले. यात उपाध्यक्ष कांचन प्रल्हाद नांदुरकर यांना अर्थ व बांधकाम, सोनाली अशोक कलोडे महिला व बालकल्याण, नीता सुधाकर गजाम समाजकल्याण, जयश्री सुनील गफाट यांना शिक्षण व आरोग्य तर मुकेश भिसे यांना कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. स्थायी समितीसह जलव्यस्थापन, कृषी, समाजकल्याण, शिक्षण व क्रीडा, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धशाळा आणि महिला बालकल्याण समिती अशा नऊ समित्यांवर सदस्यांची निवड करण्यात आली. या समित्यांमध्ये पं.स. सभापतींना प्रथमच स्थान दिल्याने जिल्हा परिषदेचे काही सदस्य दुखावले गेले. यामुळे निवडीनंतर ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती होती. हे ठरले नाराजीचे कारण पं.स. सभापतींचीही विषय समितीवर सदस्यपदी निवड करण्यात आली. पशुसंवर्धन समितीत कारंजा पं.स. सभापती मंगेश खवशी, शिक्षण समितीत आर्वीच्या सभापती शिला पवार, आरोग्य समितीत सेलूच्या सभापती जयश्री खोडे, महिला व बालकल्याण समितीत वर्धा पं.स. सभापती महानंदा ताकसांडे, पशुसंवर्धन समितीत समुद्रपूरच्या कांचन मडकाम, देवळीच्या सभापती विद्या भुजाडे कृषी समितीत निवड झाली. पं.स. सभापतींची निवड जि.प. सदस्यांच्या नाराजीचे कारण ठरले.
सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषदेच्या समित्यांचे गठण
By admin | Published: April 20, 2017 12:44 AM