जि.प.चे विद्यार्थी नव्या गणवेशात
By admin | Published: June 12, 2015 02:36 AM2015-06-12T02:36:16+5:302015-06-12T02:36:16+5:30
कॉन्व्हेंटकडे पालकांना कल वाढतच आहे. याचा थेट परिणाम जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येवर होत आहे. यावर रंगीत
शिक्षण सभापतींची माहिती : शाळा व्यवस्थापन समितीकडे अंमलबजावणी
वर्धा : कॉन्व्हेंटकडे पालकांना कल वाढतच आहे. याचा थेट परिणाम जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येवर होत आहे. यावर रंगीत गणवेशाच्या रूपाने मात करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद प्रशासन करणार आहे. यंदापासून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी नव्या रंगीत गणवेशात शाळेत जाणार आहेत.
शिक्षणाच्या अधिकारानुसार गणवेश बदलाचा अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला आहे. जि.प.शिक्षण विभागाच्यावतीने शाळा व्यवस्थापन समितीकडे गणवेश बदलाचा प्रस्ताव पाठविला. याला ९५ टक्के समित्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे यावर्षीपासून विद्यार्थ्यांना नवा गणवेश उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण सभापती मिलिंद भेंडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जि.प. उपाध्यक्ष विलास कांबळे, सभापती चेतना मानमोडे, सदस्य राणा रणनवरे, अरुण उरकांदे, सुनिता ढवळे, माजी जि.प. सभापती नितीन देशमुख उपस्थित होते.
नव्या सत्रासाठी २६ जूनपासून शाळा सुरु होणार आहे. एका विद्यार्थ्याला शासनाच्या योजनेनुसार दोन गणवेश उपलब्ध करून द्यावयाचे आहे. एक गणवेश २०० रुपयात द्यावयाचा आहे. जिल्ह्यात ५५ हजार विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहे. त्या अनुषंगाने शासनाकडून सुमारे दोन कोटी रुपये अनुदानाची गरज भासणार असल्याची माहितीही सभापती भेंडे यांनी यावेळी दिली.
मागील वर्षी गणवेश निधी पूर्णत: उपलब्ध न झाल्यामुळे काही विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळाले नव्हते. याबाबत सांगताना भेंडे म्हणाले, गणवेश खरेदीचे अधिकारी शाळा व्यवस्थापन समितीला आहे. निम्मा निधी उपलब्ध झाला आहे. उर्वरित निधी उपलब्ध होईल. या आधारावर गणवेश उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरु असल्याचेही ते म्हणाले. गणवेश बदलविण्याबाबत शिक्षण समितीमध्ये चर्चा करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक तसेच पालकसंपर्क मोहिमेदरम्यान पालकांसोबतही याबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यासाठी ११ सदस्यीय समिती नेमण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. जि.प.च्या विद्यार्थ्यांमध्ये गणवेशाबाबत एकसुत्रीपणा आणण्यासाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या गणवेशाप्रमाणे आकर्षक गणवेशाची निवड करण्यात आली. गणवेशासह जि.प.चा लोगो असलेला बेल्ट, टाय व बुटचा समावेश आहे. या गणवेशात जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व उठून दिसेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. शासनाच्या योजनेनुसार विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश उपलब्ध करून दिले जाणार आहे. यात बेल्ट, टाय व बुट मात्र मिळणार नाही, हे साहित्य पालकांना स्वखर्चाने खरेदी करावे लागणार असल्याचेही भेंडे म्हणाले.(जिल्हा प्रतिनिधी)
बेल्ट, टाय व बुटाचा भुर्दंड मात्र पालकांवर
४एक गणवेश २०० रुपयात उपलब्ध करुन द्यावयाचा आहे. जिल्ह्यात ५५ हजार विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहे. जि.प.चा लोगो असलेला बेल्ट, टाय व बुटचा समावेश असलेल्या या गणवेशात जि.प. शाळेच्या विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व उठून दिसेल. शासनाच्या योजनेनुसार विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश उपलब्ध करून दिले जाणार आहे. या गणवेशातील बेल्ट, टाय व बुट मात्र पालकांनी विकत घ्यावे लागणार आहे.