परिवहन बसच्या धडकेने १ ठार
By admin | Published: March 27, 2017 05:33 AM2017-03-27T05:33:17+5:302017-03-27T05:33:17+5:30
वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसने धडक दिल्याने रिक्षातून उतरत असतांना नविलसंग मानिसंग यांचा
वसई : वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसने धडक दिल्याने रिक्षातून उतरत असतांना नविलसंग मानिसंग यांचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वसई फाट्याजवळ गुरूवारी संध्याकाळी हा अपघात झाला होता.
वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेची बस ( एमएच ४८ के २०१) ही वसईच्या दिशेने येत होती. वसई फाट्याजवळ नविलसंग रिक्षातून उतरत होते. महापालिकेच्या बसने वळण घेताना त्यांना धडक दिली. रक्तबंबाळ अवस्थेत ते रस्त्याच्या कडेला फेकले गेले. त्यांना वालीव येथील गोल्डन पार्क या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी वसईच्या खाजगी रुग्णालयात आणण्यात आले. शुक्रवारी सकाळी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. महापालिकेच्या परिवहन सेवेचा बस चालक हा बेदरकारपणे चुकीच्या दिशेने गाडी चालवत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पालिकेची परिवहन सेवा खाजगी ठेकेदारामार्फत चालवली जाते. मात्र चालक आणि वाहकांच्या बेशिस्तीच्या वारंवार तक्रारी येत आहेत. त्यामुळे ठेकेदाराने ३७ बसवाहकांना निलंबित देखील केले होते. तसेच वाहने कशी चालवावी आणि प्रवाशांशी कसे वागावे हे सांगण्यासाठी कर्मचा-यांचे प्रशिक्षण वर्ग देखील आयोजित करण्यात आले आहेत. तरीदेखील वाहकांच्या बेशिस्त वाहन चालविण्याच्या प्रकारात घट झाली नसल्याचे या अपघातानंतर उजेडात आले आहे.
दोषी चालक मोकाटच!
संबंधित चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून अद्याप त्याला अटक झालेली नाही. चौकशी पूर्ण झाल्यानंतर आम्ही संबंधित चालकावर नियमानुसार कारवाई करू, असे परिवहन सेवा चालविणाऱ्या कंपनीचे संचालक मनोहर सकपाळ यांनी सांगितले.