नालासाेपारा येथे नायजेरियन नागरिकांची धरपकड, १४ जणांना अटक ; तुळिंज पाेलिसांची शाेधमाेहीम 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 09:47 AM2021-01-21T09:47:22+5:302021-01-21T09:48:15+5:30

पोलिसांनी तीन टीम बनवून १४ नायजेरियनना ताब्यात घेऊन चौकशी केली.

14 Nigerians arrested in Nalasapara | नालासाेपारा येथे नायजेरियन नागरिकांची धरपकड, १४ जणांना अटक ; तुळिंज पाेलिसांची शाेधमाेहीम 

नालासाेपारा येथे नायजेरियन नागरिकांची धरपकड, १४ जणांना अटक ; तुळिंज पाेलिसांची शाेधमाेहीम 

Next

नालासोपारा : शहरामध्ये बेकायदा नायजेरियन नागरिकांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने यावर अंकुश लावण्यासाठी तुळिंज पोलिसांनी पावले उचलली आहेत. मंगळवारी बेकायदा वास्तव्य करणाऱ्या या परकीय नागरिकांच्या शोधमोहिमेला सुरुवात केली आहे. पोलिसांनी तीन टीम बनवून १४ नायजेरियनना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याने तुळिंज पोलिसांनी विदेशी व्यक्ती पासपोर्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल करून १४ नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे.

ऑबे टिकेचुकू अगस्तीन (२७), ओलोरोण्डा देगी (३०), फ्रायडे इडोको चिनेचिविंग (३८), मलाची ओगबोना नगोके (४०), उचे जॉन इमेका (४७), अलिराबाकी आयदा (२७), इथेल नकुला यू (३२), एनव्हेके ख्रिस्तोफर ओन्कोवो (४४), ओकेके ओबिनो केनेथे (३३), ओकोरो लुके उकूउ (२८), सरगंला ऍबीट्रने (२४), जेम्स चुकवाजी (५४), चुकून जेक्युआय ओकोरजी (४०) आणि याओ आमिद (२६) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. नालासोपारा शहरात नायजेरियनचा अड्डा बनल्याबाबत ‘लोकमत’ने ७ डिसेंबर २०२०ला वृत्त प्रसारित केले होते. मंगळवारी संध्याकाळी ५ ते ७ वाजण्याच्या दरम्यान परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी तुळिंज पोलीस ठाण्यातील १३ अधिकारी, ४७ पोलीस कर्मचारी आणि सहा होमगार्ड यांच्या तीन टीम बनवून प्रगतीनगरच्या केडीएम बिल्डिंग, बसेरा आणि एचपी अपार्टमेंट या तीन इमारतींमध्ये छापे मारले. 

या ठिकाणी परकीय नागरिकांची शोधमोहिमेचे काेम्बिंग ऑपरेशन करून १६ नायजेरियनना ताब्यात घेतले. त्यापैकी बसेरा इमारतीतील दोन्ही नायजेरियनकडे पासपोर्ट व कागदपत्रे आढळली.

घरात सापडला बेकायदा दारूसाठा -
तुळिंज पोलिसांनी परकीय नागरिकांचा शोध घेण्यासाठी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पूर्वेकडील प्रगतीनगरच्या एका इमारतीत नायजेरियन महिलेच्या घरात बेकायदा दारूचा साठा सापडला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून हजारो रुपयांची दारू जप्त करून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी दोघा नायजेरियनना अटक केली आहे.

नालासोपारा पूर्वेतील प्रगतीनगरच्या एचपी अपार्टमेंटच्या सदनिका नंबर १०९ ची तुळिंज पोलिसांनी झडती घेतली. या वेळी किचन रूममधील रॅकमध्ये बेकायदा विनापरवाना बेकायदेशीर विक्रीसाठी २४ हजार ६९५ रुपयांच्या वेगवेगळ्या कंपनीच्या विदेशी बनावटीच्या दारूच्या व बीअरच्या बाटल्या पोलिसांना सापडल्या. पोलिसांनी त्या घरातील ५० हजारांचा मुद्देमाल व दारू जप्त केली. पोलीस शिपाई संदीप दराडे यांनी तुळिंज पोलीस ठाण्यात नायजेरियन इब्राहिम अद्दु निंग (५६) आणि महिला ब्लेशिंग इगो खान (३१) यांच्याविरोधात तक्रार दिली.

ज्या नायजेरियन नागरिकांच्या नोंदी पोलीस ठाण्यात नाहीत त्यांच्यावर तसेच रूममालक आणि दलालांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. बेकायदा राहणाऱ्या नायजेरियन नागरिकांना आणि घरमालकांना नोटिसा देऊन कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी १४ नायजेरियन नागरिकांवर दोन गुन्हे दाखल करून अटक केले आहे.
- राजेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळिंज पोलीस ठाणे

Web Title: 14 Nigerians arrested in Nalasapara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.