- हितेन नाईक/अनिरु द्ध पाटील ।पालघर/बोर्डी : वसईजवळील नायगावच्या पाणजू बेटानजीक समुद्रात संशयास्पदरीत्या जाणाऱ्या ६ बोटींचा पाठलाग करून त्यातील दोन बोटींना ताब्यात घेत त्यातील १४ तरुणांना पकडण्यात तटरक्षक दलाचे कमांडर विजय कुमार व त्यांच्या पथकाला यश आले आहे. या घटनेत ४ बोटी व त्यातील माणसे पळून जाण्यात यशस्वी झाली आहेत. ताब्यात घेतलेल्यांकडे कुठलीही ओळखपत्रे, बोटीची नोंदणी आदी कागदपत्रे मिळालेली नाहीत. त्यांच्या भाषेवरून ते बांगलादेशी असल्याच्या संशयावरून तटरक्षक दलाने त्यांना वसई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.डहाणू येथे तटरक्षक दलाने उभारलेल्या हॉवरक्राफ्ट तळावरून समुद्रावरील हालचालींना रोखण्याचे काम केले जाते. तटरक्षक दल, पोलीस, सीमा शुल्क विभाग, आदी विभागांतर्गत शनिवारी कमांडर एम. विजयकुमार, कमांडन्ट आर. श्रीवास्तव यांनी ‘सजग’ कोस्टल सिक्युरिटी एक्सरसाइज या मोहिमेंतर्गत एच १९४ या हॉवरक्राफ्टद्वारे समुद्रात तपासणी मोहीम राबवित होते. त्यावेळी सकाळी ११.३० वाजता पाणजू बेटानजीक १९.६० डिग्री उत्तरेकडे ६ बोटी रेती भरून वेगाने जात असल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर कॅप्टन कुमार यांनी आपल्या हॉवरक्राफ्टने त्या बोटीचा पाठलाग करायला सुरु वात केली. यातील २ बोटी कोस्ट गार्डने ताब्यात घेतल्या. मात्र अन्य ४ बोटी तिवरालगत लावून त्यातील सर्व लोक त्या तिवरांच्या जंगलात पसार झाले.पकडण्यात आलेल्या लोकांकडे ओळखपत्रे किंवा कुठलीही कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. तसेच या बोटीवर नंबर, कलरकोड, त्या बोटींची नोंद या सर्व गोष्टींचा अभाव होता. हे सर्व १४ लोक त्यांच्या भाषेमुळे बांगलादेशी असल्याचा संशय आहे. अधिक चौकशी केली असता या बोटींच्या मालकाचे नाव मायकल असल्याचे सांगून आबिल शेख (२५), शफीक उल (२७), आहाजीत (३३), मोईद्दीन (४५), इस्लाम (३५), बी. शेख (२२), शफीक उल (२७) एन. मुल्ला (४५), रफीगुल (१९), शहीफुल (२७), जे. मुल्ला (४०), मोंडल (२८), पायनल (३८), इब्राहिम शेख (२५) या १४ तरुणांना तटरक्षक दलाने ताब्यात घेतले.संशयितांचा ताबा वसई पोलिसांकडे‘सजग’ मोहिमेंतर्गत समुद्रातील हालचालीकडे लक्ष देत असताना आम्हाला ही बोट जाताना दिसली. त्यांच्याकडे कुठलीही कागदपत्रे नव्हती. ठाणे-घोडबंदर भागातून ही बोट आल्याची प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर ते काही देशविघातक कारवाया करण्यासाठी आले होते का, याचा तपास करण्यासाठी त्या १४ लोकांना ताब्यात घेत नंतर वसई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.- कमांडर एम. विजयकुमार, (तटरक्षक दल)यापूर्वी घडलेल्या घटनावसई तालुक्यातील अर्नाळा किनारपट्टीवरून समुद्रात मासेमारीच्या नावाखाली भिवंडी-कल्याण भागातून काही लोक रबरी टायर, दोर, गळ आदी साहित्यानिशी जात असल्याच्या घटना सप्टेंबर, आॅक्टोबर २०१८ मध्ये घडल्या होत्या. याआधी ८-१० च्या संख्येने येणाºया या संशयित लोकांच्या संख्येत हळूहळू वाढ व्हायला लागली. काही स्थानिकांना थोडे पैसे देत त्यांच्या होडीच्या माध्यमातून रात्री जाणारे हे लोक पहाटेपर्यंत समुद्रात राहू लागल्याचा प्रकार घडला होता. तसेच, तारापूर, बोर्डीच्या किनाºयालगत काही संशयास्पद बोटी व बंदूकधारी दिसल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली होती. पण त्यांचा शोध अजूनही लागलेला नाही.
पाणजूजवळ समुद्रात १४ संशयित ताब्यात; बांगलादेशी असल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 6:23 AM