ठाणे-पालघर जिल्हयातील २४ हजार संस्था संपर्कात नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 03:37 AM2017-10-08T03:37:19+5:302017-10-08T03:37:22+5:30
ठाणे आणि पालघर जिल्ह्यात ४७ हजार नोंदणीकृत संस्था आहेत. मात्र, त्यातील निम्म्याहून अधिक संस्था धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या संपर्कातच नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे पालघर जिल्ह्यासाठी अद्याप स्वतंत्र धर्मदाय आयुक्त कार्यालयच सुुरु करण्यात आलेले नाही.
वसई : ठाणे आणि पालघर जिल्ह्यात ४७ हजार नोंदणीकृत संस्था आहेत. मात्र, त्यातील निम्म्याहून अधिक संस्था धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या संपर्कातच नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे पालघर जिल्ह्यासाठी अद्याप स्वतंत्र धर्मदाय आयुक्त कार्यालयच सुुरु करण्यात आलेले नाही.
नोंदणीकृत संस्थांचा कारभार नियमितपणे चालावा, त्यासाठी संस्थांनी नियमितपणे लेखापरिक्षण करावे आणि बदल कळवावेत यासाठी ठाणे जिल्हा धर्मदाय आयुक्त कार्यालयाने विशेष मोहिम हाती घेतली आहे.
पाच वर्षांहून अधिक काळ लेखापरिक्षण अहवाल आणि बदल सादर न करणाºया संस्थांची नोंदणी रद्द होते. अशा संस्थांना पुन्हा कार्यरत करण्यासाठी एक विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून वाघोली येथील शनी मंदिरात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाणे धर्मदाय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक धर्मदाय आयुक्त रिना राय, छाया उमरेडकर, निरीक्षक राजेश राठोड, कार्यालय अधिक्षक सायली महाजन उपस्थित होते. त्याचबरोबर ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बबनशेठ नाईक, फादर अल्मेडा, वसई जनता बँकेचे उपाध्यक्ष संतोष देशमुख, शनी मंदिर ट्र्स्टचे जयवंत नाईक, दत्तात्रेय देशमुख यावेळी हजर होते.
पाच वर्षांहून अधिक काळ लेखापरिक्षण अहवाल आणि बदल कार्यालयाला कळवले नाहीत तर त्यांची नोंदणी कायद्यानुसार रद्द होते. पण, चांगले सामाजिक कार्य करणाºया संस्थांना काही कारणास्तव लेखापरिक्षण अहवाल आणि बदल कळवता आले नसतील असे गृहीत धरून ३१ डिसेंबरपर्यंत विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे, असेही महाजन यांनी सांगितले. या मोहिमेत सहभागी होणाºया संस्थांना मार्गदर्शन केले जाईल तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही केली जाणार नाही, अशी ग्वाही महाजन यांनी दिली.
यापुढे लेखापरिक्षण अहवाल किंवा संस्थेतील बदल सादर करण्यासाठी ठाण्याला यायची गरज नाही. चॅरिटी डॉट महाराष्ट्र जीओव्ही या वेबसाईटवर जाऊन संस्थांनी आपले अहवाल सादर करावेत. माहिती देताना वर्गणी मागण्यासाठी जीएसटीची आवश्यकता नाही. पाच हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाºया संस्थांना लेखापरिक्षणाची गरज नाही, अशी माहिती राजेश राठोड यांनी यावेळी बोलताना दिली.
पालघर जिल्ह्यात किमान पंधरा हजार नोंदणीकृत संस्था आहेत. असे असताना येथील संस्थांच्या पदाधिकाºयांना ठाण्याला जावे लागते.
स्वतंत्र्य कार्यालय हवे!
- ठाणे आणि पालघर जिल्ह्यात ४७ हजारांहून अधिक संस्थांनी नोंदणी केली आहे. मात्र, यातील २४ हजारांहून अधिक संस्था संपर्कात नसून त्यांच्याशी संवाद साधणेही कठीण जात आहे, अशी माहिती सायली महाजन यांनी यावेळी बोलताना दिली.
जिल्ह्यासाठी स्वतंत्र धर्मदाय आयुक्त कार्यालयाची निर्मिती करण्यात आलेली नाही. त्यामुळे नोंदणीकृत संस्थांना कामासाठी दूरवरच्या ठाण्याला जावे लागते. म्हणूनच स्वतंत्र कार्यालय निर्माण करण्यात यावे, अशी मागणी या शिबीरात उपस्थित संस्थांच्या पदाधिका-यांनी केली.