नालासोपारा - वसई-विरार पालिका आयुक्तांनी स्मशानभूमीत काम करणा-या ३५ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले असून यातील ५ कर्मचाºयांना कोविडसाठी कामावर ठेवले आहे. आयुक्तांनी सर्व स्मशानभूमीची माहिती घेतल्यानंतर ज्या ठिकाणी सहा कर्मचारी आहेत तिथे तीन आणि ज्या ठिकाणी चार कर्मचारी आहेत तिथे दोन कर्मचारी ठेवण्यात आले आहेत. ऐन कोरोनाच्या काळात कर्मचाºयांना कामावरून काढल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. या प्रकरणी पालिका आयुक्त गंगाथरन डी. पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.वसई-विरार महानगरपालिका हद्दीत ८८ स्मशानभूमी आहेत. कोरोनाच्या काळात २७ स्मशानभूमीवर १२६ कर्मचारी कामावर ठेवले होते. ते कर्मचारी तीन शिफ्टमध्ये काम करीत होते. परंतु आयुक्तांनी ज्या ठिकाणी कर्मचारी जास्त आहेत, त्या ठिकाणी कपात केली आहे. स्मशानभूमीतील कामाच्या आवश्यकतेनुसार कर्मचारी ठेवण्यात आले असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे. ज्या ठिकाणी मृतदेह कमी येतात, त्या ठिकाणी दिवसा एक आणि रात्रपाळीला एक कर्मचारी ठेवण्यात आला. त्यामुळे ३५ कर्मचारी जास्त असल्याने त्यांना कमी केले आहे. दरम्यान, वसई-विरारमधील स्मशानभूमी कंत्राटावर देण्यात आलेल्या आहे. आतापर्यंत मराठा इंटिलेजस सिक्युरिटी सर्व्हिस, गुरुजी इंटरप्रायजेस व शिवम इंटरप्रायजेस या तीन कंपन्यांना कंत्राट देण्यात आलेले होते. २०२० मध्ये मराठा इंटिलेजस सिक्युरिटी सर्व्हिस यांनी टेंडर भरले नसल्याने गुरुजी इंटरप्रायजेस आणि शिवम इंटरप्रायजेस या दोन कंपन्यांना कंत्राट देण्यात आलेले आहे.कोरोनामुळे २७ स्मशानभूमींत १२६ कर्मचारी कामावर ठेवण्यात आले होते. ३५ कर्मचाºयांना कामावरून कमी केले असून त्यातील पाच जणांना कोविडसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. ३० कर्मचाºयांची जर गरज लागली, तर त्यांना कामावर बोलवण्यात येईल. - राजेंद्र लाड कार्यकारी अभियंता
वसई-विरारमधील स्मशानभूमीतील ३५ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले, पालिका आयुक्तांचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 1:31 AM