वाड्यात जमीन मोजण्या खोळंबल्यात
By admin | Published: February 9, 2016 02:19 AM2016-02-09T02:19:17+5:302016-02-09T02:19:17+5:30
तालुक्यातील शेतकरी अथवा उद्योजक यांच्या जमिन मोजणीची कामे गेल्या आॅक्टोबर महिन्यापासून भूमिअभिलेख कार्यालया कडून केली जात नसल्याने त्यांची अनेक कामे
वाडा : तालुक्यातील शेतकरी अथवा उद्योजक यांच्या जमिन मोजणीची कामे गेल्या आॅक्टोबर महिन्यापासून भूमिअभिलेख कार्यालया कडून केली जात नसल्याने त्यांची अनेक कामे त्यामुळे खोळंबली आहेत. त्यामुळे भूमिअभिलेख कार्यालयाच्या मनमानी कारभाराचा फटका शेतकऱ्यांसह उद्योजकांना बसत आहे.
वाडा तालुका हा शेती प्रधान तालुका आहे. त्यातच येथे 'डी प्लस झोन' असल्याने शेकडो कारखाने वसलेले आहेत. तर नविन कारखाने येण्याचे काम सुरूच आहे. येथील शेतकरी गरजेपोटी आपली जमीन विकतो. तर काही शेतकरी आपली जमिन मोजून हद्द कायम करतो किंवा पोटहिस्सा करतो. तसेच शेतकऱ्यांने विकलेली जमिन उद्योजक घेतो त्या नंतर तोही आपल्या जमिनीची मोजणी करून हद्द कायम करतो. मात्र गेल्या आॅक्टोबर महिन्यापासून वाडा भूमिअभिलेख कार्यालयाने शेतकरी अथवा उद्योजक यांच्या जमिन मोजणीची कामे थांबवली असल्याने शेकडो शेतकरी अथवा उद्योजक हे जमिन मोजणीच्या कामासाठी या कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. मात्र त्यांना ठोस उत्तर या कार्यालयाकडून मिळत नसल्याने ते तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.
या संदर्भात भूमिअभिलेख कार्यालयाचे सहाय्यक अधिकारी किशोर ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता आॅक्टोबर महिन्या पासून वनपट्टे मोजणीचे काम सुरू असल्याने इतर मोजण्यांचे काम बंद केले आहे. असे वरिष्ठ कार्यालयाकडून सांगण्यात आले असल्याने त्यामुळे इतर मोजणीची कामे पपूर्णपणे बंद केली असून हे काम मार्च महिन्या पर्यत चालणार आहे. अशी माहिती त्यांनी दिली.