ऐन दिवाळीत मच्छीबाजारात शुकशुकाट; मंदीचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 11:08 PM2019-10-29T23:08:50+5:302019-10-29T23:09:08+5:30
कोळीवाड्यात फटाकेच फुटले नाहीत
बोर्डी : क्यार चक्रीवादळाने कहर केल्याने तसेच आर्थिक मंदीमुळे कोळीवाड्यात दिवाळी साजरी झालेली नाही. डोक्यावर कर्ज आणि हाती पैसा नसल्याने ऐन उत्सवात कोळीबांधवांच्या घरात शुकशुकाट आहे. दरम्यान, १ नोव्हेंबरपर्यंत मासेमारीला न जाण्याच्या सूचना असल्या, तरी जीवावर उदार होऊन पोटासाठी समुद्रात जाणार असल्याची प्रतिक्रि या काही मच्छीमारांनी दिली.
१ आॅगस्ट रोजी खोल समुद्रात मासेमारी करण्याची बंदी उठली, तरी पालघर जिल्ह्यातील मच्छीमारी हंगामाचा प्रारंभ नारळीपौर्णिमेनंतर केला जातो. त्यानंतर मोठे उधाण आणि गणेशोत्सवामुळे काही दिवस मासेमारीत खंड पडला होता. आता ऐन दिवाळीत बाजारात माशांना मागणी असते. परंतु क्यार चक्रीवादळामुळे सुरक्षेच्या कारणास्तव मासेमारीला गेलेल्या बोटींना बंदरात येण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे इंधन, मजुरी, बर्फ यावर केलेला खर्च वाया गेला आहे. एका बोटीला सरासरी ३० ते ४० किलो पापलेट मिळायचे, तेथे रिकाम्या हाती परतावे लागल्याची माहिती झाई मासेमारी बंदरातील काही मच्छीमारांनी दिली.
दरम्यान, दिवाळीनिमित्त बाजारात माशांना मोठ्या प्रमाणात मागणी असताना विक्रीसाठी मासे उपलब्ध नाहीत. त्यामुळे आर्थिक मंदीचा सामना करावा लागतो आहे. कोळी बांधव सण साजरा करण्याऐवजी घरांमध्ये बसले आहेत. त्याचा परिणाम बच्चेकंपनीवरही झाला असून त्यांना फटाके आणून द्यायला पैसे नसल्याची खंत पालकांनी व्यक्त केली. शासनाकडे नेहमीच नुकसान भरपाईची मागणी केली जाते, मात्र प्रत्यक्षात ती दिली जात नाही.
या व्यवसायाला मंदीचा फटका बसला आहे. बाजारात मागणी असून विक्र ीसाठी मासेच उपलब्ध नसल्याचा विरोधाभास दिसून येतो. त्यामुळे हाती पैसा नसल्याने कोळी बांधवांनी दिवाळी साजरी केलेली नाही. अशी बिकट परिस्थिती असताना याकडे कोणाचेच लक्ष नाही.
- संदेश दवणे, सचिव, झाई मांगेला मच्छिमार सोसायटी