- आरिफ पटेल, मनोर/पालघरमुंबई-अहमदाबाद महामार्गावर लूटमार, चोरी, दरोडे टाकणारी टोळी मनोर पोलिसांनी पकडली असून त्यांच्याकडे इटालियन पिस्टल नावाच्या दोन पिस्तूल, चॉपर, जिवंत काडतुसे मिळाली आहेत. या टोळक्याने अनेक ठिकाणी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यांना पालघर न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.मुंबई-अहमदाबाद महामार्गलगत कुडे गावाच्या हद्दीत तीळ जंगलामध्ये कोणीतरी अनोळखी तरुण आहेत म्हणून त्यांचा शोध स्थानिक पोलीस पाटलाने घेतला असता त्यांच्याकडे शस्त्र असल्याची माहिती मनोर पोलिसांना कळविण्यात आली. लगोलग पोलिसांनी साध्या वेशातील एक टीम पाठवून आपण तलाठी, सर्कल, ग्रामसेवक आहोत, अशी बतावणी करुन दरोडेखोरांना आपण जमीन मोजणीसाठी आल्याचे भासवले. दरम्यान, पोलिसांच्या हालचालीवरुन संशय आलेल्या आरोपीने दरीच्या दिशेने उडी मारली. मात्र, क्षणाचाही विलंब न लावता पो. उपनिरीक्षक अक्षय सोनवणे यांनी त्यांच्या पाठीवर सिनेस्टाइल उडी मारुन त्याला ताब्यात घेतले. या प्रयत्नामध्ये ते किरकोळ जखमी झाले आहेत. तर इतर दोघांना सह. पो. नि. मनोज चाळके, पो. उपनिरीक्षक डी. सोनवणे, पंकज पाटील, हवालदार भांगरे, कणसे, सूर्यवंशी, गाडेकर, सुतकर, पवार, गवळी व पाटील आदींनी सापळा रचून पकडले.मनोर पोलीस ठाण्यात चोरी, दरोडे, दमदाटी केल्याप्रकरणी तसेच विनापरवाना हत्यार बाळगल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेश ऊर्फ खाटा दळवी (वय २४, राहणार उद्धवा तलासरी) साईनाथ गोविंद फड (वय २१, बिहरीपोंडा) अनुपकुमार कमलेशवर प्रसाद पटेल रा बोईसर असे आरोपींची नावे आहेत.आरोपींपैकी एकावर ३५ गुन्हे दाखल- चाळके म्हणाले की, पकडलेल्या आरोपीने मनोर पोलीस ठाण्याचे हद्दीत वाहन लुटणे, चालकास धाक दाखवून पैसे लुटणे, दरोडे टाकणे असे अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. या चौकशीमध्ये अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. - आरोपींपैकी नरेश ऊर्फ खाटा दळवी याच्यावर गुजरात, महाराष्ट्र व दादरा नगर हवेली अशा तीन राज्यांतील रॉबरी, दरोडे, धमकवणे चोरी असे एकूण ३५ गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडे एक इटालियन पिस्टल बंदूक, एक बारा बोर रायफल, सात ते आठ चॉपर व सहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
सशस्त्र दरोडेखोरांना शिताफीने पकडले
By admin | Published: October 22, 2016 3:32 AM