विरार : आगामी काळात वसई-विरारमधील हॉस्पिटलमध्ये 'ऑक्सिजन'ची गरज भागणार असून, अखेर लिक्विड ऑक्सिजनसाठीचा टँकर उपलब्ध झाल्याने महापालिकेची काळजी मिटली आहे. वसई-विरारमधील ऑक्सिजन निर्मिती कंपन्यांना रायगडवरून आता दररोज १० टन लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे, तर गुजरात व विशाखापट्टणम येथूनही लिक्विड ऑक्सिजनसाठी या कंपनी प्रयत्न करत आहेत. पैकी पाच टन लिक्विड ऑक्सिजन बुधवारी सकाळी प्राप्त झाला असल्याची माहिती पालिकेचे नोडल अधिकारी राजेंद्र कदम यांनी दिली.वसई-विरार महापालिका क्षेत्रात मागील काही दिवसांत कोविड-१९ ची रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे रुग्णांना ऑक्सिजनची गरज व्यक्त केली जात असतानाच नालासोपारा येथे सोमवारी रात्री ऑक्सिजनअभावी काही रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी केला होता. मात्र, पालिका उपायुक्त किशोर गवस यांनी या आरोपांचे खंडन करत पालिका रुग्णालयांत ऑक्सिजनचा मुबलक साठा असून, नालासोपारा येथील खासगी रुग्णालयात झालेले मृत्यू ऑक्सिजनअभावी नसून, कोरोनामुळे झाल्याची माहिती दिली होती. दरम्यानच्या काळात काही खासगी रुग्णालयांनी आपल्याजवळ पुढील तीन दिवस पुरेल इतका साठा असून, भविष्यात ऑक्सिजनची गरज व्यक्त केली होती.खासगी रुग्णालयांच्या या माहितीमुळे पालिका यंत्रणेची झोप उडाली होती. वसई-विरारमध्ये गॅलेक्सी व अन्य एक कंपनी ऑक्सिजन निर्मिती करते, तर लिओ आणि स्पिड या ऑक्सिजनची वितरण व्यवस्था बघतात. मात्र, ऑक्सिजन निर्मितीसाठी लागणारे ‘लिक्विड ऑक्सिजन’ आणण्यासाठी टँकर उपलब्ध होत नसल्याने ऑक्सिजन निर्मिती होत नसल्याची खंत निर्मिती कंपनी मालकांनी व्यक्त केली होती. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांनी धावपळ करत या कंपन्यांना लिक्विड ऑक्सिजन आणण्यासाठी एक टँकर उपलब्ध करून दिला आहे. या माध्यमातून या कंपन्यांना रायगड-अलिबाग येथून दररोज १० टन कच्चा माल उपलब्ध होणार आहे, तर विशाखापट्टणम व गुजरात येथूनदेखील लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध होईल, यासाठी या कंपनी खासगी पातळीवर प्रयत्न करत असल्याची माहिती आहे.
आज सकाळी पाच टन लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध झाला आहे. गॅलेक्सी कंपनीकडून जिओ वितरण कंपनीला ९३ सिलिंडर उपलब्ध करून देण्यात आले असून, ही कंपनी हॉस्पिटलमध्ये त्याचा पुरवठा करेल.- राजेंद्र कदम, नोडल अधिकारी, वसई-विरार महापालिका
पालिकेकडे ऑक्सिजन सिलिंडरची मुबलक उपलब्धता होती. मात्र, भविष्यात तुटवडा होऊ नये म्हणून पालिकेने आणखी ऑक्सिजनची तजवीज करून ठेवली आहे. त्यानुसार रोज दहा टन लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे.- गणेश पाटील, जनसंपर्क अधिकारी, वसई-विरार महापालिका