अनिरुद्ध पाटील डहाणू : जिल्ह्यातील जूचंद्र हे रांगोळीचे गाव म्हणून प्रसिद्ध असून येथल्या घराघरात उत्तम रांगोळी कलाकार पाहायला मिळतात. त्याच प्रमाणे डहाणूतील चिंचणी गावातील बारीवाड्यात राहणारा बत्तीसवर्षीय अमित सदानंद बारी हा कलाकार रंगोळीतून थ्रीडी इफेक्ट देऊन लौकिक मिळवतो आहे.
त्याचे शिक्षण जेमतेम आठवीपर्यंत झाले आहे. त्याची आई घरासमोर रांगोळी काढायची ते पाहून त्याला वयाच्या दहाव्या वर्षांपासून हा छंद जडला. त्यामधून शाळेत आणि गावात वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमा वेळी घेण्यात येणाऱ्या रांगोळी स्पर्धेत त्यांनी भाग घेऊन बक्षिसे पटकावली आहेत. तर स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, हिंदू सण-सणावारीत तसेच लग्न कार्य, वास्तु-शांती अशा कार्यक्र माला त्याला बोलवले जाते. ज्या कलाकृतीने त्याला नाव लौकिक मिळवून दिला, त्या रांगोळीतील थ्रीडी प्रवासाची कहाणी तशी भन्नाट आहे.
एकेदिवशी तो घरी टीव्ही पाहत असताना कपटावर ठेवलेल्या टेलकम पावडरच्या डब्यावर त्याचे लक्ष गेले. तो डबा हुबेहूब रंगोळीतून चितरण्याची कल्पना त्याला सुचली आणि येथेच पहिली थ्रीडी रांगोळी त्याच्या हातून साकारली गेली. चार पैकी तीन भागांचे निरीक्षण केल्यास सर्व बाजूनी ती कलाकृती सारखीच दिसणे ही या प्रकारच्या रांगोळीची खासियत असल्याचे त्याने लोकमतशी बोलताना सांगितले. तर आतापर्यंत या पद्धतीच्या अनेक रांगोळ्या त्यांनी काढल्या आहेत.
एका पाच बाय पाच आकारातील साध्या पद्धतीची रांगोळी साकारण्यास दोन तासांचा अवधी लागत असल्यास थ्रीडी रांगोळीला चार ते पाच तासांचा अवधी लागतो. एखादी प्रतिमा साध्य रांगोळीतून उतरविण्यासाठी रेषांचे गणित जुळल्यानंतर कणकी दळायच्या. चाळणीने किंवा चहा गाळायच्या चाळणीने त्यावर रंग भरता येत असल्याने, ते काम कमी कालावधीत हाता वेगळे करता येते. तर थ्रीडी प्रकारात हाताने रंग भरल्या शिवाय पर्याय नसतो, ते भरताना सर्वबाजूने कलाकृती सारखीच दिसते नां! याकडे लक्ष द्यावे लागत असल्याचे तो म्हणाला.
मुंबई, गुजरा व दमण येथून मागणीजिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये जाऊन ज्या प्रमाणे कला सादर केली. त्याच प्रमाणे मुंबई, गुजरात, दमण या ठिकाणांहून बोलावणे येते. त्याद्वारे चांगले पैसेही मिळतात. तर चिंचणी येथे देवीच्या कळस पुजन सोहळ्यानिमित्त बारी समाजातर्फे सत्कार करण्यात आला आहे.आर्थिक परिस्थिति नसताना शिक्षण पूर्ण करता न आल्याची खंत होती, मात्र या छंदाच्या माध्यमातून ओळख आणि लौकिक मिळत असल्याने तो समाधानी आहे. भविष्यात या कलाप्रकारातील शिकवणी वर्गाच्या माध्यमातून अनेक कलाकार घडविण्याचा मानस त्याने व्यक्त केला.