भातलावणीची कामे वसई तालुक्यात सुरू, ८ हजार हेक्टरवर होणार लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 03:33 AM2018-07-02T03:33:20+5:302018-07-02T03:33:31+5:30
वसई तालुक्यात पावसाने बळीराजाला चांगली साथ दिल्याने चिखलणी पूर्ण होऊन भात लावणीला प्रारंभ झाला आहे. यंदाच्या हंगामात तालुक्यातील ८ हजार ७०० हेक्टरचे क्षेत्र भात लागवडी खाली येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
पारोळ : वसई तालुक्यात पावसाने बळीराजाला चांगली साथ दिल्याने चिखलणी पूर्ण होऊन भात लावणीला प्रारंभ झाला आहे. यंदाच्या हंगामात तालुक्यातील ८ हजार ७०० हेक्टरचे क्षेत्र भात लागवडी खाली येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
भात शेतीच्या कामातील मशागतीचे उलकटनी, राबपेरणी असे महत्वाचे टप्पे आटोपल्यानंतर आता चिखलणी सुरु झाली आहे. या दरम्यान भात रोपाला नत्राचा पुरवठा द्यावा लागतो, त्या दृष्टिने खतांचे डोस दिले जातात. त्यासाठी वसई तालुक्यात खतांचाही मुबलक पुरवठा करण्यात करण्यात आला आहे. कारण भात लावणी नंतर पीक चांगले येण्यासाठी खतांचा डोस दोनदा भात पिकाला द्यावा लागतो. या मुळे उत्पादन खर्चात ही वाढ झाली आहे.
या वर्षी पेरणी योग्य पाऊस झाल्याने राबातील भात रोप लावणीसाठी तयार झाली असल्याने पाऊस पडताच वसई ग्रामीण भागात काही शेतकऱ्यांनी भात लावणीची सुरुवात केली आहे. तर काही शेतकरी मजुरांची जुळवाजुळवी करण्याच्या मागे लागले आहेत.
या वर्षी तासाचे ट्रॅक्टरचे दर, मजूरी, बी- बियाणे, खते या वर्षी महाग झाले असल्याने भात शेती करणे परवडत नसल्याचे माजिवलीचे शेतकरी कमलाकर पारधी यांनी लोकमतला सांगितले.
वसई तालुक्यात ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पीक कर्ज देण्याचे काम वेगात चालू असून त्या साठी शेतकरी मेळावे घेण्यात येत आहेत. त्यांचा लाभ जास्तीत जास्त शेतकºयांनी घ्यावा.
- राजेश पाटील, संचालक
ठाणे जिल्हा मध्यवर्ती
सहकारी बैंक