कोट्यवधींची यंत्रसामग्री, वाहनखरेदी वादग्रस्त ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 11:53 PM2021-02-24T23:53:19+5:302021-02-24T23:53:26+5:30

 वसई-विरार महापालिका क्षेत्रातून दररोज ६५० मेट्रिक टन कचरा निघतो.

Billions of rupees worth of machinery and vehicles will be controversial | कोट्यवधींची यंत्रसामग्री, वाहनखरेदी वादग्रस्त ठरणार

कोट्यवधींची यंत्रसामग्री, वाहनखरेदी वादग्रस्त ठरणार

Next

प्रतीक ठाकूर

विरार : वसई-विरार महापालिकेने कोरोना संकटकाळात अन्य खर्चांना कात्री लावत वाहन खरेदी तसेच पालिका हद्दीत जमणाऱ्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी कोट्यवधीची यंत्रसामग्री घेतली, मात्र या सामग्रीच्या देखभाल-दुरुस्तीसाठी लागणारी आवश्यक उपाययोजना पालिकेकडे नसल्याचे समजते. यातील काही यंत्रे पालिकेच्या भोयदापाडा येथील क्षेपणभूमीवर कार्यरत करण्यात येणार आहेत. मात्र, क्षेपणभूमीवर जाण्यासाठी लागणारा रस्ता आणि अन्य सुविधाही नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे कचरा व्यवस्थापनाचा फियास्को उडणार असून आगामी निवडणुकीत  हा मुद्दा चांगलाच तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 वसई-विरार महापालिका क्षेत्रातून दररोज ६५० मेट्रिक टन कचरा निघतो. हा कचरा महापालिकेच्या गोखिवरे- भोयदापाडा येथील क्षेपणभूमीवर जमा करण्यात येतो. हा कचरा आतापर्यंत पालिकेच्या विविध ठेकेदारांकडून जमा करून तो क्षेपणभूमीवर जमा केला जात आहे. याकरिता महापालिकेने विभागवार २० ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. क्षेपणभूमीवर जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेकडे आतापर्यंत कोणतीही यंत्रणा नव्हती.

महापालिका क्षेत्रातून निघणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने हरित लवादाने वसई-विरार महापालिकेला ८० लाख, पालिकेजवळ स्वतःची क्षेपणभूमी नसल्यामुळे ८० लाख, तर या दोन्हीची अंमलबजावणी दिलेल्या मुदतीत न केल्यामुळे दर महिना २० लाख रुपये दंड ठोठावला होता. 

दरम्यान, जानेवारीच्या अखेरीस पालिकेच्या विकासकामांसंदर्भातील बैठकीत पालकमंत्री दादाजी भुसे यांनीही महापालिका कचरा व्यवस्थापनाबाबतीत कोणती पावले उचलली आहेत, याची विचारणा अधिकाऱ्यांना केली होती. यावेळी पालिका करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली होती. त्यानुसार १० ट्रॉमील, पाच पोकलेन, ५० ट्रिपर आणि दोन लाँग बूम, दोन शॉर्ट बूमची ऑर्डर दिली आहे. मात्र, या यंत्रसामग्रीच्या देखभाल-दुरुस्तीसाठी पालिकेकडे गॅरेज, मेकॅनिक व मेन्टेनन्ससाठी कोणतीही सुविधा नाही. तसेच भोयदापाडा क्षेपणभूमीवर जाणारा रस्ताही महापालिकेने बनवलेला नाही. परिणामी, खड्डे आणि कचरा भरल्या रस्त्यावरूनच ही वाहने पालिकेला न्यावी लागणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

Web Title: Billions of rupees worth of machinery and vehicles will be controversial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.