वाहतूक व्यवस्थेचा उडाला बोजवारा; पालघरमध्ये अतिरिक्त प्रवासी वाहतूक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 11:05 PM2019-10-30T23:05:33+5:302019-10-30T23:06:11+5:30
घोषणा झाली, अंमलबजावणी नाहीच
हितेन नाईक
पालघर : तीन तसेच सहा आसनी रिक्षांमधून अतिरिक्त प्रवासी वाहतूक बंद करण्यात येणार असून शहरातील सात अधिकृत रिक्षास्टँडवर केवळ पाच रिक्षा ठेवण्याची परवानगी देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र या घोषणेची अंमलबजावणी अद्याप झाली नसल्याने पुन्हा एकदा वाहतूक ठप्प होत असल्याचे दिसत असून दुसरीकडे दुकानदारांनी आता पदपथही गिळंकृत करण्यास सुरुवात केली आहे.
जिल्हानिर्मिती नंतर सहा वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही पालघर शहरातील बेशिस्त वाहतूक व्यवस्था काही सुधारताना दिसत नाही. या बेशिस्त वाहतुकीमुळे शहराला बकाल स्वरूप प्राप्त होत असून नागरिकांना सुरक्षितरित्या चालणे देखील मुश्किल झाले आहे. सकाळपासून रात्री ८.३० वाजेपर्यंत नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागतो.
जिल्हानिर्मितीनंतरही अतिक्रमण, रस्ते रुंदीकरण, सिग्नल व्यवस्था, वाहतूक पोलिसांचे नियंत्रण आदी वाहतूक नियंत्रणासाठी अत्यावश्यक बाबी गांभीर्याने न घेतल्याने कोंडी आणि रस्त्यावरील अतिक्र मणाने रौद्र रूप धारण केले होते. यावर उपाययोजना आखण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेत उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवक, राज्यपरिवहन (एसटी) विभाग, विद्युत वितरण, बांधकाम विभाग, रिक्षा - टेम्पो संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, रेल्वेचे अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन गेल्या महिन्यात पालघर नगरपरिषदेच्या सभागृहात करण्यात आले होते.
शहरातील वाहतूक कोंडीला आळा घालण्याच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून अधिकारी नाईक यांनी वाहतूक आराखड्याबाबत बनवलेला नकाशा या बैठकीत सादर केला होता. यात एकेरी वाहतूक, अवजड वाहनांना बंदी, मच्छीमार्केटचे स्थलांतर, गाड्या पार्र्किंग व्यवस्था यांबाबत उपस्थितांशी चर्चा केली होती. रिक्षाधारकाची संख्या १५०० पर्यंत पोचल्याने या बेछूट तर काही विनापरवाना वाढलेल्या रिक्षाधारकाना आवरण्याची तसदी कुठल्याही विभागाकडून घेतली जात नसल्याने शहरात फक्त सात रिक्षास्टँडवर पाच रिक्षा उभ्या ठेवण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या निर्णयावर रिक्षाधारकांच्या काही संघटनांनी आक्षेप घेतल्यावर यापुढे तीन तसेच सहा आसनी रिक्षांना दिलेल्या परवानगीपेक्षा अतिरिक्त प्रवासी बसण्यास बंदी आणून कारवाईचा बडगा उचलला जाईल असे पालघर पोलिसांनी जाहीर केले होते. मात्र, या वाहतूक कोंडीला काही बेशिस्त रिक्षाधारक कारणीभूत ठरत असल्याने तसेच रिक्षा संघटनांकडून पुरविल्या जाणाऱ्या आर्थिक रसदीमुळे हा कारवाईचा बडगा टिकून रहात नाही, हे अनेक वर्षांपासून दिसले आहे. त्यामुळे निर्णय घेऊन ३६ दिवस उलटून गेल्यानंतरही वाहतूक व्यवस्थेत १ टक्का ही सुधारणा झाल्याचे दिसलेले नाही.
रस्त्यारस्त्यावर खाद्य पदार्थांच्या हातगाड्या, फळ - भाजी विक्रेत्यांच्या गाड्या, दुचाकी - चार चाकी गाड्यांचे रस्त्यावरील पार्र्किंग यामुळेही शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याने त्यांच्या विरोधात सुरू झालेली कारवाई पुन्हा थंडावली आहे. याचा फायदा घेत लोकांना व्यवस्थित चालता यावे
म्हणून नगरपालिकेने बनविलेल्या पदपथावर दुकानदारांनी मंडप घालून खाद्यपदार्थांसाठी गॅस, शेगडी पेटवून दुकाने थाटली. खुलेआम लोकांच्या सुरक्षेशी हे दुकानदार जीवघेणा खेळ मांडत असून प्रशासन डोळे मिटून हा तमाशा पाहत असल्याचे दिसून आले होते. यावर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे.