...याला म्हणतात काटकसर!
By admin | Published: October 24, 2016 01:55 AM2016-10-24T01:55:55+5:302016-10-24T01:55:55+5:30
मराठा मूक मोर्चाच्या प्रारंभस्थानी मोर्चेकऱ्यांसाठीचे प्रचंड प्रमाणात साहित्य साठवलेले होते. त्यात हस्तफलक, पाट्या, बॅनर अशी बरीच सामग्री होती
अरिफ पटेल, पालघर
मराठा मूक मोर्चाच्या प्रारंभस्थानी मोर्चेकऱ्यांसाठीचे प्रचंड प्रमाणात साहित्य साठवलेले होते. त्यात हस्तफलक, पाट्या, बॅनर अशी बरीच सामग्री होती. एवढे सारे तयार करणे, साठवणे, आणणे, वाटणे, हे केवढे कष्टमय कार्य. त्यांच्या निर्मितीचा खर्च तर खूपच असणार, म्हणून एका पदाधिकाऱ्याने लोकमतकडे कौतुकाचे उद्गार काढले असता त्याने या प्रतिनिधीला बाजूला घेतले आणि हळूच सांगितले, साहेब हा जगन्नाथाचा रथ आहे. आमच्याकडे आर्थिक बळ फारसे नाही, पण मोर्चा तर यशस्वी करायचाय. कुठे काही कमी पडायला नको. मग, यावर आम्ही विचार केला की, मोर्चाची माहिती रिसायकल्ड करता येईल, म्हणजे पुन्हा वापरता येईल. मग तारीख, वार, ठिकाण, वेळ याचा उल्लेख असलेले साहित्य त्या दृष्टीने उपयुक्त नव्हते. पण, मोर्चेकऱ्यांनी हाती धरायचे फलक आणि बॅनर्स पुन्हा वापरता येण्यासारखे होते.
इम्पॅक्ट राखूनही काटकसर साधता येणार होती, म्हणून आम्ही आमचे मनोर व अन्य ठिकाणचे कार्यकर्ते ठाण्याच्या मोर्चासाठी पाठवले होते. त्यांनी ठाण्याच्या मोर्चेकऱ्यांनी वापरलेले बॅनर्स आणि हस्तफलक गोळा करून पालघरला आणले. त्याचाच पुनर्वापर आम्ही इथे करणार आहोत. यामुळे कार्यकर्त्यांनी मोठ्या कष्टाने संकलित केलेला समाजबांधवांचा निधी अधिक काटकसरीने वापरला गेला आणि स्वच्छताही राखली गेली, असे त्यांनी अभिमानाने सांगितले.