नारळाचे उत्पादन निम्म्याने घटणार; बागायतदारांना आर्थिक झळ, नारळ महागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 10:56 PM2019-11-01T22:56:48+5:302019-11-01T22:57:13+5:30
कीडरोग आणि अति पावसाचा फटका
अनिरुद्ध पाटील
बोर्डी : यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने भात, चिकू आणि नारळ इ. उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. दरम्यान, नारळ उत्पादनात निम्म्याने घट होऊन आगामी काळात या फळांच्या किमती दुपटीने वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे धार्मिक सण - उत्सव आणि लग्नसराई काळात किमती वाढून ग्राहकांच्या खिशाला आर्थिक झळ बसणार आहे.
पालघर जिल्ह्यात सुमारे साडेपाच हेक्टर क्षेत्र नारळ लागवडीचे असून सागरी भागात मोठ्या प्रमाणात बागायती आहेत. रेताड जमीन, उष्ण तसेच दमट वातावरणात वेस्ट कोस्टल टॉल या जातीचे उत्पादन घेतले जाते. या फळांचा मोठा आकार, पाण्याची चव आणि आतील मलाई यासाठी दक्षिणेकडील नारळापेक्षा त्याला वाढती मागणी आहे. मात्र यंदा पावसाचे प्रमाण आणि तीव्रता अधिक असल्याने फुल आणि फळगळतीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे पक्व नारळ मिळेपर्यंत निम्मेच उत्पादन हाती येईल अशी शक्यता बागायतदारांनी वर्तवली आहे.
सध्या या झाडांवर स्पायरेलिंग व्हाईटफ्लाय या किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. डहाणू आणि बोर्डी परिसरात नारळ बागांमधील अनेक झाडांवर स्पायरेलिंग व्हाईट फ्लाय नावाची ही कीड आढळली आहे. ती झावळीच्या खालच्या बाजूला राहून अंडी घालते. त्याचा आकार हा गोल रिंगणासारखा असतो. हे कीटक शरीरातून चीकट द्रव सोडत असून त्यावर sooty mold नावाची काळी बुरशी वाढल्याने प्रकाश संश्लेषण क्रि या मंदावली जाऊन अन्न निर्मितीस अडथळा येतो. दरम्यान, पोषणाच्या कमतरतेमुळे फुलाफळांचे प्रमाण कमी होऊन उत्पादन घटणार आहे. शिवाय नारळा व्यतिरिक्त पेरू, सफेद जांबु, फुलझाडे आणि शोभेची झाडे क्रोटन आदीवर ती मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने बागायतदारांचे आर्थिक नुकसान होणार आहे.
दरम्यान, नारळाचे प्रमाण कमी होऊन किंमतीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता, आगामी सण - उत्सव आणि लग्नसराईत नागरिकांच्या खिशाला आर्थिक झळ बसणार आहे. त्याचा आर्थिक फायदा घाऊक आणि किरकोळ व्यापारी घेतील. नेहमीप्रमाणे उत्पादक वंचित राहणार असल्याने शासकीय मदत मिळणार का? याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.
या किडीची ओळख, व्यवस्थापन व नियंत्रण या विषयी माहिती तसेच शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हा कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड येथे नजीकच्या काळात दोन प्रशिक्षणे घेण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांनी किटकनाशकाची फवारणी करण्याचा अवलंब केला आहे. - प्रा. उत्तम सहाणे, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड
पालघर जिल्ह्यात नारळ क्षेत्र साडेपाच हेक्टर आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक असल्याने फुलगळती झाल्याने उत्पादनात निम्म्याने घटणार आहे. त्याचा आर्थिक फटका नारळ बागायतदारांना बसेल. - यज्ञेश सावे, अध्यक्ष, ठाणे जिल्हा नारळ उत्पादक हितवर्धक संस्था