आयुक्त आले पण कार्यालय कुठे? आयपीएस अधिकारी सदानंद दातेंना करावी लागणार प्रतिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 10:20 AM2020-09-04T10:20:18+5:302020-09-04T12:39:46+5:30
गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन युती शासनाने मीरा भाईंदर व वसई विरारसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची घोषणा केली होती. परंतु पोलीस आयुक्तालय कार्यालयासह अनेक उणिवा असल्याने सदर घोषणा केवळ कागदावरच राहिली होती.
मीरा-भाईंदर - केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेले ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची ‘घरवापसी’ झाली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नव्याने स्थापन करण्यात आलेल्या व बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बहुचर्चित मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस आयुक्त पदावर दाते यांची नियुक्ती केली आहे. बुधवारी तसे गृहविभागाने त्यांच्या नियुक्तीचे आदेश पारित केले.
मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलीस आयुक्तालया साठी शासनाने पोलीस आयुक्त म्हणून सदानंद दाते यांची नियुक्ती केल्यानंतर गुरुवारी स्वतः दाते यांनी मीरारोड मधील कार्यालयासाठीच्या इमारतीची पाहणी करून ती जागा निश्चित केली आहे. दाते यांना आयुक्त म्हणून बसण्यास कार्यालयच नसल्याने त्यांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात बसून गुन्हे, समस्या, पोलीस बळ आदींचा आढावा घेतला.
गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन युती शासनाने मीरा भाईंदर व वसई विरारसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची घोषणा केली होती. परंतु पोलीस आयुक्तालय कार्यालयासह अनेक उणिवा असल्याने सदर घोषणा केवळ कागदावरच राहिली होती. महाविकास आघाडी शासन आल्यावर आमदार प्रताप सरनाईक, गीता जैन आदींनी पोलीस आयुक्तालय सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे केली होती. शासनाने या पोलीस आयुक्तालयासाठी सदानंद दाते यांच्या रूपाने पहिला पोलीस आयुक्त दिला असून गुरुवारी दाते यांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात येऊन कामकाजास सुरवात केली. यावेळी त्यांच्या सोबत ठाणे व पालघर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते .
दाते यांनी दोन्ही शहरातील गुन्हेगारी, गुन्हे तसेच समस्यांचा आढावा घेतला . पोलीस ठाणे आणि बळ जाणून घेतले . पोलीस आयुक्तालयाच्या अनुषंगाने कामकाज व नियोजना बाबत चर्चा केली. पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालयासाठी मीरारोडच्या प्लेझेन्ट पार्क भागातील भूखंड राखीव ठेवण्यात आला असला तर सध्या मात्र आयुक्तांच्या कार्यालयासाठी जागाच नाही. वास्तविक मीरारोडच्या रामनगर येथील पालिका इमारतीत पोलीस आयुक्तालय सुरु करण्याचा निर्णय झाला होता. परंतु महापालिकेने सदर इमारतच अजून रिकामी करून दिलेली नाही. दाते यांनी आज सदर इमारतीची पाहणी केली व सदर ठिकाणी पोलीस आयुक्तालय सुरु करण्याची तयारी दाखवली आहे. या शिवाय त्यांनी कनकिया येथील पालिका इमारतीची पाहणी केली परंतु राम नगर इमारतीला त्यांनी पसंती दिली आहे असे सूत्रांनी सांगितले. सदर इमारत पालिका रिकामी करून देईल त्या नंतरच कार्यालय सुरु करता येणार असल्याने तो पर्यंत दाते हे कार्यालय विनाचे पोलीस आयुक्त ठरतील.
कोण आहेत सदानंद दाते?
सदानंद दाते हे आयपीएस १९९० बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी राज्यासह सीआरपीएफ आणि सीबीआयमध्येही सेवा बजावली आहे. २००७ मध्ये सदानंद दाते यांना राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित केले आहे. मुंबईवर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्यांनी कामा हॉस्पिटलमधील अनेक महिला आणि लहान मुलांचे प्राण वाचवले होते. या हल्ल्यात सदानंद दाते जखमीदेखील झाले होते. सदानंद दाते हे मितभाषी, प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी सीबीआयसह, मुंबई क्राइम ब्रॅँच, फोर्स वन मधील जबाबदारी सक्षमपणे सांभाळली आहे. केंद्रीय न्याय विभागात दाते हे सहसचिव म्हणून गेली पाच वर्षे कार्यरत होते. फेब्रुवारी २०२० मध्ये मुदत संपल्यानंतर ते तातडीने दिल्लीहून परतले. फेब्रुवारी पासून त्यांना सरकारने सक्तीच्या प्रतीक्षेत (कम्पल्सरी वेटिंग) राहावयास ठेवले होते. मुंबई गुन्हा अन्वेषण शाखेत सहआयुक्त म्हणून काम पाहात असताना, त्यांची २५ फेब्रुवारी २०१५ रोजी दिल्लीला न्याय विभागात प्रतिनियुक्ती झाली.