विक्रमगड : सबंध कोकणात पावसाळी भाज्यांची पर्वणी असते. विक्रमगड हा तसा डोंगरी तालुका असल्याने येथील बाजारपेठेतही हल्ली कंर्टुली किंवा कंटवली या रान भाजीला मोठी मागणी आहे. चविष्ट असल्याने या भाजीचे दर ही वाढले असून किलोला दोनशे रुपये ग्राहक मोजत आहेत. फक्त पावसाळ्यात उपलब्ध असल्याने तसेच आयुर्वेदीक महत्व असल्याने या भाजीकडे ग्राहकांचा कल आहे. सध्या आवक कमी असल्याने या भाजीचे दर चढे असले तरी येत्या काही दिवसात कंर्टुल्यांची आवक वाढेल व त्यावेळेस हा भाव ७० ते ८० रुपये किलो या दराने असेल असा अंदाज आहे. दरम्यान, सध्या बाजारात नेहमीच्या भाज्यांचे दर ही वाढलेले असल्याने रान भाज्यांना पसंती मिळत आहे. मात्र, ही भाजीसर्वांची आवडीची असल्याने त्याला मागणीही जास्त प्रमाणात आहे़ ही भाजी पावसाळयात मुख्यत्वे श्रावणामध्ये याची जोरात खरेदी असते त्यामुळे येथील स्थानिक आदिवासींना यापासुन रोजगार निर्मीती होते़कंर्टुली शोधण्यासाठी दररोज एका हातामध्ये काठी व दुसऱ्या हातात टोपले घेऊन अनेक आदिवासी स्त्री-पुरुषांचा घोळका जंगल अक्षरश:पिंजून काढतो जंगलातुन ही कंर्टुली जमविण्याचे काम या काळात जोरात सुरु असते़ संध्याकाळच्या दोन घासांचा प्रश्न घेऊन ही हे काम करीत असतात. (वार्ताहर)
आदिवासींचा आर्थिक आधार ठरतेय कंटुर्ली
By admin | Published: July 30, 2016 4:33 AM