वसई : वसई-विरारमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच एका मुलीच्या वडिलांना कोरोनाने गाठल्याने आपल्या मुलीचे दोन दिवसांवर आलेले लग्न पुढे ढकलले होते. यातून बरे झाल्यावर आपल्या मुलीचे लग्न अगदी थाटात करू असे सांगणाऱ्या त्या जन्मदात्या वडिलांना अखेर रुग्णालयात घडलेल्या भीषण आगीने गाठले आणि एका क्षणात सर्व काही होत्याचे नव्हते झाले.
ही करुण कहाणी आहे, वसईच्या पश्चिम पट्ट्यातील नाळे गावाचे रहिवासी जनार्दन म्हात्रे (६३) यांची. म्हात्रे हे आपली धर्मपत्नी व तीन मुलींसह नाळे गावात राहतात. त्यांचा एसीसी सिमेंटच्या डिलरशीपचा व्यवसाय उषा ट्रेडर्स हा पत्नीच्या नावाने सुरू होता. त्यांना नमिता, नम्रता व मानसी या तीन मुली आहेत. त्यात नम्रता व नमिता या दोन जुळ्या मुलींपैकी नमिताचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते, तर नम्रताचे शनिवारी २४ एप्रिल रोजी लग्न होते. मात्र, दहा दिवसांपूर्वी जनार्दन म्हात्रे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे तसेच शासनाने लाॅकडाऊन घोषित केल्यामुळे लग्नसोहळा रद्द करीत त्यांनी नालासोपारा येथील अलायन्स रुग्णालयात उपचारासाठी स्वतःला दाखल करून घेतले होते.
मात्र, २१ एप्रिलला त्यांची ऑक्सिजन लेवल पुन्हा ८५ पर्यंत खाली उतरल्याने हाॅस्पिटल प्रशासनाने त्यांच्याकडे ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्यामुळे दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. दिवसभर म्हात्रे यांच्या कुटुंबीयांनी वसई-विरारमधील सर्व रुग्णालये ऑक्सिजन बेड उपलब्ध आहे का म्हणून पालथी घातली.
मात्र सर्व ठिकाणी बेड उपलब्ध नसल्याचे सांगितले. या दरम्यान संध्याकाळी विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयात अतिदक्षता विभागात एक ऑक्सीजन बेड खाली असल्याची माहिती मिळताच त्यांना तिथे हलविण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी रात्रीपर्यंत त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत ऑक्सिजन लेवलही ९६ पर्यंत पोहचली. मात्र पहाटे लागलेल्या आगीत त्यांचा दुदैवी मृत्यू झाला आणि सर्व स्वप्नांचा चुराडा झाला.