CoronaVirus: पोलीसदादा, जरा स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्या; ताण पुन्हा वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 11:10 PM2021-04-24T23:10:08+5:302021-04-24T23:10:42+5:30
कोरोना लॉकडाऊनचा परिणाम : पोलिसांवरील ताण पुन्हा वाढला
मंगेश कराळे
नालासोपारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. यामुळे जागोजागी नाकाबंदी, बंदोबस्त लावण्यात आल्याने पोलिसांवरील ताण वाढला आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तब्येतीची व आरोग्याची काळजी घरच्यांसह त्यांच्या लहान मुला-मुलींनाही आता वाटू लागली आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील १२ पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असलेल्या ७५ टक्के पोलीस अधिकारी, महिला व पोलीस अंमलदारांनी आतापर्यंत कोरोनाची पहिली लस घेतली आहे तर ५० ते ६० टक्के पोलिसांनी कोरोनाची दुसरी लस घेतली आहे.
राज्य शासनाने कडक निर्बंध लावल्यावर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी व मनाई आदेशाचा भंग होऊ नये, विनाकारण फिरणाऱ्या, मास्क न लावणाऱ्यांवर कारवाईसाठी आणि गर्दी न करण्याचे आवाहन करण्यासाठी पोलीस अधिकारी आणि अंमलदार रस्त्यावर उतरले आहेत. पण तरीही काही नागरिक बिनदिक्कत रस्त्यावर विनाकारण फिरत आहेत.
यामुळे कोरोनाचा प्रसार वेगाने होत असून, हे थांबणे गरजेचे असल्याने फ्रंटलाईन सेवा देण्यासाठी उतरणाऱ्या पोलिसांबद्दल नागरिक अद्यापही गंभीर नाहीत. पोलीस प्रशासन वेळोवेळी आवाहन करत असतानाही नागरिक त्याकडे कानाडोळा करत आहेत. काही पोलीस अधिकारी व अंमलदारांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या परिवारातील सदस्य बाधित झाले असून, तेही वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.