अंथरुणात पडलेल्या मनसे कार्यकर्त्यावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 11:49 PM2018-03-27T23:49:19+5:302018-03-27T23:49:19+5:30
भूमाफियांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मनसेने आंदोलन केल्यानंतर महसूल विभागाच्या तक्रारीवरून मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसई : भूमाफियांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मनसेने आंदोलन केल्यानंतर महसूल विभागाच्या तक्रारीवरून मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात पक्षघातामुळे अंथरुणावर असलेल्या एका पदाधिकाऱ्यालाही आरोपी म्हणून गोवण्यात आले आहे. हा प्रकार लक्षात येताच न्यायालयानेही पोलीस आणि महसूल अधिकाºयांना फटकारले.
राजीवली येथील जागेवर अतिक्रमण करून त्याठिकाणी बेकायदा बांधकाम करणाºया भूमाफियांवर गुन्हा दाखल करण्यात यावा यामागणीसाठी मनसेने आंदोलन सुरु केले आहे. यावेळी तहसिलदार किरण सुरवसे यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते. पण, त्यानंतरही कारवाई न झाल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी तहसिलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी पोलीस बळाचा वापर करून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले गेले. निवासी नायब तहसिलदार स्मिता गुरव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात मनसेचे विभागप्रमुख विजय केळुस्कर यांनाही आरोपी करण्यात आले आहे. केळुस्कर गेल्या सहा महिन्यांपासून पक्षघातामुळे अंथरुणाला खिळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे केळुस्कर आंदोलनातही सहभागी झाले नव्हते. त्यानंतरही पोलिसांनी धरपकड करून त्यांना न्यायालयात हजर केले. केळुस्करांची अवस्था पाहिल्यानंतर न्यायालयाने पोलिसांना फटकारले.