डहाणूतील रस्त्यांचा श्वास कोंडला
By admin | Published: February 8, 2016 02:22 AM2016-02-08T02:22:09+5:302016-02-08T02:22:09+5:30
डहाणू नगरपरिषद क्षेत्रात वाढती अतिक्रमणे आणि बेशिस्त पार्र्किंगमुळे वाहतुकीचा बोजवारा उडत असून त्यावर उपाय करण्याची गरज असताना पोलीस तसेच नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहेत
डहाणू : डहाणू नगरपरिषद क्षेत्रात वाढती अतिक्रमणे आणि बेशिस्त पार्र्किंगमुळे वाहतुकीचा बोजवारा उडत असून त्यावर उपाय करण्याची गरज असताना पोलीस तसेच नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहेत. डहाणू फोर्ट रोड, थर्मलपावर, इराणी रोड, सागरनाका रोड या परिसरात सतत होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे अपघात घडण्याची शक्यता असून विद्यार्थी, वृद्ध, महिलांना जीव मुठीत घेऊनच रस्ता ओलांडावा लागत असल्याने सर्वसामान्य जनतेत संताप व्यक्त केला जात आहे.
डहाणू रेल्वे स्थानकाच्या परिसरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याने पर्र्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाढती रहदारी, रस्त्यांवरील फेरीवाले, अरुंद रस्ते त्यातच सकाळच्या सुमारास मुंबई गुजरातकडे जाणारे कामगार आपले टु-व्हीलर रस्त्यावरच पार्र्किंग करून दिवसभर जात असल्याने या परिसराचा श्वास गुदमरतो आहे. यामुळे सतत अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही वाहनचालक तर डहाणू रेल्वे स्थानकाच्या येण्याजाण्याचा मार्गावरच वाहने उभी करून इकडे-तिकडे भटकत असतात. परिणामी मुंबई, गुजरात बाजूने एखादी ट्रेन आली की धावपळीत अनेक प्रवासी खाली पडून जखमी देखील झाले आहेत. याबाबत अनेकवेळा रेल्वे पोलिसांना तक्रार केली जाते. परंतु आरपीएफचे जवान एक-दोन दिवस कारवाई करण्याचा देखावा करून याबाबींकडे दुर्लक्ष करीत असतात.
दरम्यान या परिसरात वाढत्या अतिक्रमणांचा विळखा आवळत चालला आहे. संध्याकाळच्या सुमारास तर थर्मल रोड, तसेच इराणी रोड वर चायनीज, वडापाव, हातगाडीचालक, फळ, फूल, भाजी, विक्रेते तसेच किरकोळ साहित्य विक्रेते ठिय्या देत असल्याने रस्त्याच्या दुतर्फा ठप्प होत असते.