कर्जबाजारी व्यावसायिकाने कुटुंबाला पाजले विष, दोघे गंभीर, आणखी दोन मुले वाचली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 04:57 AM2017-09-19T04:57:11+5:302017-09-19T04:57:14+5:30
नालासोपा-यात कर्जबाजारी झालेल्या व्यावसायिकाने आपली पत्नी, दोन मुलींना विष पाजून नंतर स्वत: विषप्राशन केले. यात त्या व्यावसायिकासह त्याच्या सात वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. तर, बायको आणि दुस-या मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. सुदैवाने दोन मुले आजोबांकडे गेल्याने बचावली. ही घटना सोमवारी सकाळी उजेडात आली.
वसई (पालघर) : नालासोपा-यात कर्जबाजारी झालेल्या व्यावसायिकाने आपली पत्नी, दोन मुलींना विष पाजून नंतर स्वत: विषप्राशन केले. यात त्या व्यावसायिकासह त्याच्या सात वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. तर, बायको आणि दुस-या मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. सुदैवाने दोन मुले आजोबांकडे गेल्याने बचावली. ही घटना सोमवारी सकाळी उजेडात आली.
कॉस्मेटिकचा छोटासा व्यवसाय करणारे मनीष सिंग (३२) हे पत्नी पिंकी (२९), दोन मुली आणि दोन मुलांसह नालासोपाºयातील प्रगती नगरमध्ये राहात होते. कर्जबाजारी झाल्याने ते अतिशय तणावाखाली होते. त्यातूनच त्यांनी संपूर्ण कुटुंबासह जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आधी आपल्या १३ व १० वर्षीय मुलांना वडिलांकडे पाठवून दिले होते. रविवारी रात्री मनीषने पिंकी तसेच प्रगती (७) आणि प्रतीक्षा (३) या तिघांना खाण्यातून विष दिले. त्यानंतर स्वत:ही विषप्राशन केले.
सोमवारी सकाळी मनीषचे वडील जितेंद्र सिंग मनीषच्या घरी आले, त्यावेळी सर्व जण बेशुद्धावस्थेत आढळून आले. घाबरलेल्या जितेंद्र सिंग यांनी पोलिसांना बोलावून चौघांनाही वसई-विरार महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये नेले. मनीष आणि प्रगती दोघांचा मृत्यू झाला असून, पिंकी आणि प्रतीक्षा यांची प्रकृत्ती चिंताजनक आहे. पत्नी पिंकी शुद्धीवर आल्यानंतरच संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
>चिठ्ठी सापडली
घरात मनीषने लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. त्यात, ‘मै जा रहा हूंँ, मेरी मौत के लिये किसीको जिम्मेदार नहीं ठहराना,’ असा मजकूर त्यात आहे. मनीषने आत्महत्येचा निर्णय का घेतला, स्वत:सह पत्नी व मुलींना मारण्याचा निर्णय घेऊन मुलांनाच का वाचविले, हे प्रश्न अनुत्तरित आहेत. मात्र, कर्जबाजारी झाल्यामुळेच नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे.