- आशिष राणे
वसई : वाढता कोरोना, त्यात एप्रिलचा कडकडीत महिना आणि सोबत उन्हाळा आला की बऱ्याच ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याचे वास्तव सर्वत्र पाहायला मिळते; परंतु उर्वरित भागांत जरी पाणीटंचाई भासत असली तरी वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेल्हार आणि उसगाव धरणात जूनअखेरपर्यंतचा पाण्याचा साठा शिल्लक आहे, तर जिल्ह्यातील सूर्याच्या धामणी धरणात वर्षभर पुरेल इतका समाधानकारक पाणीसाठा असतानाही वसई-विरारच्या काही भागांत पाणीटंचाई असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.एकीकडे वसई-विरार महापालिका पाणीपुरवठा विभागाने पाणीसाठा समाधानकारक असल्याचे स्पष्ट केले आहे, तर दुसऱ्या बाजूला मात्र पालिका क्षेत्रात पाण्याचे दुर्मिक्ष्य असल्याचे दिसत आहे. याविरोधात काही दिवसांपूर्वी पालिकेवर हंडा मोर्चाही काढण्यात आला होता. दरम्यान, वसई-विरारकरांना पाणीपुरवठा करणारी पालघर व वसई तालुक्यात एकूण तीन धरणे असून, यापैकी धामणी (सूर्या ) धरणात आजच्या घडीला ४६ टक्के इतका मुबलक पाणीसाठा आहे, तर पालिकेच्या पेल्हार धरणात ३७ टक्के आणि उसगाव धरणात ४३ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती पाणीपुरवठा अभियंता सुरेंद्र ठाकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यामुळे नागरिकांना पावसाळ्यापर्यंत तरी पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही असेच या धरणांतील शिल्लक पाणीसाठ्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
सदोष जल वितरण व्यवस्थेमुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. अर्थातच नुसत्या योजना नकोत तर तांत्रिकदृष्ट्या कोणतीही योजना परिपूर्ण झाली नाही. पालिका प्रशासनाने तांत्रिक अडचणी दूर केल्यास नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटेल.- सुदेश चौधरी, माजी स्थायी समिती सभापती
पेल्हार व उसगाव धरणात जूनअखेरपर्यंत पुरेल इतका साठा आहे, तर धामणी (सूर्या) धरणात वर्षभर पुरेल इतका साठा आहे. तरीही नागरिकांनी पाणी जपून वापरावे. कारण कोरोनामुळे सतत हात धुवावे लागत असल्याने पाण्याचा जास्त वापर होत असल्याने पाण्याचा वापर काटकसरीने होणे गरजेचे आहे.- सुरेंद्र ठाकरे, पाणीपुरवठा अभियंता, वसई