जिल्हाधिकाऱ्यांना मनसेचे साकडे, शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 06:10 AM2018-11-13T06:10:56+5:302018-11-13T06:11:51+5:30
जिल्ह्यात रिलायन्स गॅस पाईपलाईन साठी भूसंपादनाचं काम सुरु झाल्यापासून शेतकऱ्यांकडून संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा योग्य मोबदला रिलायन्सने दिला नसल्याची जाणीव
पालघर : रिलायन्स गॅस पाईप लाईन आणि कर्म ब्रह्मांड गृहप्रकल्पाच्या व्यवस्थापकांकडून सर्वसामान्य जनतेची झालेली आर्थिक फसवणूक तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय पालघर येथे सुरू करणे या विषयावर मनसे जिल्हाध्यक्ष कुंदन संखेंच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्ट मंडळाने जिल्हाधिकाºयाची भेट घेऊन तातडीच्या कारवाईची मागणी केली.
जिल्ह्यात रिलायन्स गॅस पाईपलाईन साठी भूसंपादनाचं काम सुरु झाल्यापासून शेतकऱ्यांकडून संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा योग्य मोबदला रिलायन्सने दिला नसल्याची जाणीव डॉ. नारनवरे यांना शिष्टमंडळाने करून दिली. जमिनीच्या मूल्यांकनाच्या चार पट दर शेतक-यांना देण्याचे केंद्र सरकारचे धोरण असतांना देखील ते पायदळी तुडवून शेतक-यांची आर्थिक फसवणूक मोठ्या प्रमाणात केली गेलेली आहे असा आरोप करून शेतकºयांनी विरोध केला तर पोलीस बळाचा वापर करु न, ही पाईपलाईन टाकण्याचं काम हुकूमशाही पद्धतीने सुरुच असल्याचा दावा शिष्टमंडळाने केला. या विषयावर ताबडतोब निर्णय घेऊन, बाधित संबंधित शेतकर्यांना न्याय द्यावा अशी ताठर भूमिका शिष्टमंडळाने घेतल्याने, येत्या आठ दिवसात याबाबत निर्णय घेतला जाईल असे नारनवरे यांनी आश्वस्त केले.
केळवे रोड येथील बहुचर्चित कर्म ब्रह्मांड विकासकांकडून ग्राहकांना भुलविणाºया जाहिराती देऊन भुरळ पाडली आणि त्याच ग्राहकांकडून गृहप्रकल्प उभारण्याच्या नावाखाली आगाऊ रक्कम व प्रत्येक महिन्याला उरलेल्या किमतीचा सम हप्ता घेऊन करोडो रु पयांची फसवणूक केल्याची धक्कादायक बाब शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली. कष्टाने जोडलेले पैसे यात गुंतवल्यानंतर आज दोन वर्षांनंतर देखील प्रत्यक्ष जागेवर कोणतेही बांधकाम झालेलं नाही. पैसेही नाहीत व घरेही नाहीत अशी गुंतवणूकदारांची स्थिती झाल्याने चिंता व्यक्त करून मनसे शिष्टमंडळाने विकासकांवर आर्थिक अपहार प्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी केली. करून फसवणूक झालेल्या ग्राहकांचे पैसे परत करण्याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी केली.
जिल्ह्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालय पालघर येथे सुरू करणे गरजेचे असतांना देखील त्या बाबत प्रशासनाची भूमिका उदासीनतेची असल्याचे स्पष्ट मत मनसे शिष्टमंडळाने व्यक्त केले. पालघर जिल्ह्याचा विस्तार आणि लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत असल्याने वसई येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अपुरे पडत असल्याचे संखे यांनी नारनवरे यांच्या निदर्शनास आणून दिले.
सदर चर्चेत मनसेचे उपजिल्हाध्यक्ष भावेश चुरी, तालुकाध्यक्ष मंगेश घरत,तलासरी तालुकाध्यक्ष सुनील ईभान, पालघर शहराध्यक्ष सुनील राउत, मनविसे लोकसभाध्यक्ष धीरज गावड, महिला शहराध्यक्ष गीता संखे, मनसे पदाधिकारी शैलेश हरमळकर, सागर शिंदे, रूपेश पाटिल, उदय माने,निलिम स्ंखे,वैभव घरत,निलेश पाटील,तन्मय संखे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.