वसई : वसई-विरार मेट्रो चालू करण्याबाबत विस्तार प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी दिल्ली मेट्रो रेल कॉपोरेशन (डी.एम.आर.सी.) यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली असून काम प्रगतीपथावर आहे. हा अहवाल तयार करण्याकरिता सुमारे ९ महिन्यांचा कालावधी अपेक्षित असून घोडबंदर पूल ते वसई-विरार असा मार्ग असून त्यांची अंदाजित लांबी २४ कि.मी. आहे, ही बाब आमदार ठाकूर व एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आली.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रस्तावित व प्रलंबित कामांबाबत अधिकाऱ्यांसमवेत बुधवारी दुपारी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी महापौर, नेते मंडळी यांच्या शिष्टमंडळाला सोबत घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी आमदार ठाकूर यांनी बापाणे ते नायगांव पश्चिम रस्ता आणि उड्डाणपूल या कामाबाबत रेल्वेच्या अधिकारी वर्गाला पूर्व-पश्चिम विभागाची कामे पूर्ण झाली असल्याचे सांगून आता उड्डाणपुलाचे काम बाकी असल्याचे स्पष्ट केले. याबाबतीतील चर्चेत रेल्वेच्या सर्व परवानगी प्राप्त झाल्याचे सांगून रेल्वला पावसाळ्यानंतर काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या, तर पावसाळ्यानंतर काम सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असे ही आश्वासन दिले.दरम्यान प्रस्तावित व विलंब होत असलेला वसई -भार्इंदर खाडीवरील पूल बांधणे हे काम १५०१ कोटी रुपयाचे असून त्याबाबत निविदा मागविण्यात आली असून अंतिम निविदा १ जुलै २०१९ पर्यंत मागविण्यात आल्या आहेत. या प्रकल्पासाठी अनेक परवानग्या प्राप्त झाल्या असून वनविभाग व मिठागर खात्याच्या परवानग्या प्रलंबीत आहेत. मात्र त्या परवानग्या मिळविण्याचे प्रयत्न प्राधिकरणामार्फत चालू आहेत.एकूणच चर्चेत झालेल्या सर्व प्रलंबित कामांबाबत सर्व परवानग्या मिळाल्यानंतर निविदा मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरु वात ही करण्यात येईल, असेही यावेळी अधिकाºयांनी सांगितले. नायगांव ते वैतरणा पूर्व पश्चिम रिंगरूट रस्त्याचे २६०० कोटी रुपयांचे प्रस्तावित काम राज्याचे मुख्यमंत्री कार्यालयात पाठविण्यात आले असून यापैकी ११३६ कोटी रुपयाचे पश्चिमेकडील काम प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर प्राधान्याने करता येईल. याबरोबरच वसई-विरार शहरास भविष्यात होणारा १८५ एम.एल.डी. पाणीपुरवठा व वसई-विरार अलिबाग कॅरीडॉर या संबंधातही सविस्तर चर्चा झाली.आमदारांसोबत जम्बो शिष्टमंडळ : या चर्चेत सहभागी म्हणून बविआ अध्यक्ष तथा वसईचे आम.हितेंद्र ठाकूर यांच्या समवेत वसई-विरार महापालिकेचे महापौर रुपेश जाधव, माजी महापौर नारायण मानकर, अजय खोखाणी, प्रफुल साने, रमेश कोटी, तर अधिकाºयांमध्ये स्वत: महानगर आयुक्त आर.ए.राजीव, अतिरिक्त आयुक्त सोनिया सेठी, अतिरिक्त आयुक्त संजय खंदारे मूर्ती, डांगे असे अनेक वरिष्ठ अधिकारी हजर होते. यावेळी सकारात्मक चर्चा झाली.