वसई: एका बिल्डरकडून २५ लाखाची खंडणी घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या डॉ. अनिल यादव याने माहितीच्या अधिकाराचा वापर करून अनेकांकडून खंडणी वसूल केली असून त्याला बळी पडलेल्यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.वसईतील एका बिल्डरला अनधिकृत बांधकामप्रकरणी पिस्तूलाचा धाक दाखवून त्याच्याकडून २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी डॉ. अनिल यादव आणि त्याचा साथिदार अमोल पाटील विरोधात वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्याच्या वतीने खंडणीतील दीड लाख रुपये घेताना स्थानिक गुन्हे शाखेने अमोलला रंगेहाथ अटक केली आहे. कोर्टाने त्याला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर घटनेनंतर डॉक्टर फरार झाला आहे. या गुन्ह्यात हवा असलेल्या डॉ. यादव व अटकेत असलेला पाटील यांनी अनेक लोकांकडून माहितीच्या अधिकाराखाली माहितीचा गैरवापर करून व कारवाईची धमकी देऊ़न खंडणी घेतल्याची माहिती मिळाली आहे. अशाप्रकारे त्यांनी कोणाकडून धमकी देऊन पैसे घेतले असल्यास किंवा मागणी करीत असल्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधिक्षक शारदा राऊत यांनी केले आहे. दरम्यान, नवघर प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी असताना डॉ. अनिल यादवला नोव्हेंबर २०१० ला लाच घेताना अटक करण्यात आली होती. (प्रतिनिधी)
डॉ. यादवविरोधात तक्रार करण्याचे पोलिसांचे आवाहन
By admin | Published: March 28, 2017 4:53 AM